सातारा मतदारसंघामध्ये संभ्रम कायम

सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारीचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जिल्हा दौऱ्यानंतरही साताऱ्याचा उमेदवार दोन चार दिवसांत जाहीर होईल असे सांगून पवारांनी महायुतीचे टेन्शन वाढवले. भाजपने अजूनही खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेले नाही. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूंनी सातारचा संभ्रम कायम ठेवला आहे.

खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दिलेला नकार ही शरद पवारांची गुगली आहे काय अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. सातारा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये राजकीय संघर्ष टोकदार होणार हे उघड आहे. साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाची चर्चा असली तरी त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडे उमेदवार कोण असणार याची उत्सुकता ताणली आहे.

उदयनराजे भोसले दिल्लीवरून येतानाच राजे समर्थकांनी जोरदार साताऱ्यातून रॅली काढली. भाजपच्या सात याद्या आतापर्यंत प्रसिद्ध झाल्या तरी उदयनराजे भोसले यांच्या नावावर अद्यापही शिक्कामोर्तब झालेले नाही. महायुतीने वाढवलेला सस्पेन्स हा राजेसमर्थकांना बुचकळ्यात टाकणारा ठरला आहे. पक्षश्रेष्ठींशी माझे बोलणे झाले आहे असे सांगितले जात असले तरी उदयनराजेंच्या उमेदवारीला एवढा उशीर का या प्रश्नाची सल अजून कार्यकर्त्यांच्या मनातून गेलेली नाही.

दुसरीकडे महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांनी साताऱ्यात मेळावा घेऊन जिल्ह्याच्या सहा विधानसभा मतदारसंघांतील 200 कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीत कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला आणि प्रसंगी राजकीय गुगली टाकायलाही ते विसरले नाहीत. शरद पवार व खासदार श्रीनिवास पाटील यांचे मैत्र सर्वांना माहिती आहे. स्वतः शरद पवार यांनी सातारा लोकसभा लढायला दिलेला नकार व प्रकृतीचे कारण देऊन श्रीनिवास पाटील यांनी घेतलेली माघार या दोन्ही गोष्टी पडताळून पाहिल्या तर हा पवारांचा दुसरा राजकीय डाव तर नाही ना अशी शक्यता राजकीय धुरिणांना वाटत आहे.

पवार यांनी पत्रकार परिषदेत आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, सत्यजितसिंह पाटणकर अशी काही संभाव्य नावे पुढे करून एकदम पाचव्या नावाची घोषणा करायची हे पवारांचे धक्का तंत्र तर नाही ना, कदाचित महायुतीच्या नेत्यांना गाफील ठेवण्याचा पवारांचा डाव असावा, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. पवारांचे धक्कातंत्र आणि उदयनराजे यांच्या उमेदवारीवर भाजपने अद्याप शिक्कामोर्तब न केल्याने सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा ताण वाढत चालला आहे. सध्या तरी साताऱ्यात उमेदवार निश्चित नसल्यामुळे राजकीय समीकरणांची कोणतीही गोळाबेरीज झालेली नाही. राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाकडून ही जागा हातातून सटकते की काय अशी अस्वस्थ खदखद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. तर उदयनराजे उमेदवार असे समजून भाजपच्या राजे समर्थकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे .

बेरजेच्या राजकारणाला गती
प्रतिकूल परिस्थिती अनुकूल बनवण्याचा जोरदार प्रयत्न उदयनराजे यांनी चालवला आहे. त्यांचे चुलत बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन उदयनराजे यांनी शनिवारी एक प्रकारे बेरजेचे राजकारण केले आणि लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही तुमच्याबरोबर आहोत असा शब्द शिवेंद्रसिंहराजे यांनी दिल्याने सातारा विधानसभा मतदारसंघात जमेच्या समीकरणांची सुरुवात असण्याची शक्यता व्यक्त होते आहे. अन्य काही विधानसभा मतदारसंघांमध्ये उदयनराजेंच्या अनुपस्थितीबद्दल असलेल्या नाराजीसंदर्भात उदयनराजेंकडून डॅमेज कंट्रोल सुरू झाले आहे. उदयनराजे मित्र समूहाच्या गोटातून सहा विधानसभा मतदारसंघात प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि मेळावे यांचा नियोजन लवकरच जाहीर केले जाणार आहे.