“मला माझ्याच पक्षाकडून शिवीगाळ आणि धमक्या..” काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी व्यक्त केल्या भावना

नवी दिल्ली – एकाच व्यक्तीच्या नेतृत्त्वामध्ये लढल्या गेलेल्या असंख्य निवडणुका काॅंग्रेस पक्ष सातत्याने हरला आहे. त्यामुळे पक्षाच्या नेतेपदात बदल करण्याबाबत मी जयपूर साहित्य संमेलनात बोलले होते. मात्र, त्यानंतर मला माझ्याच पक्षाकडून शिवीगाळ होत असून धमक्याही दिल्या जात आहेत. मी पक्षाची निष्ठावान कार्यकर्ती असून कोणा व्यक्तिशी माझी निष्ठा नाही, अशा शब्दांत कांग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या असलेल्या शर्मिष्ठा येथे वाराणसी लिटरेचर फेस्टीव्हलमध्ये टॉक ऑन प्रणव या विषयावर बोलत होत्या. काँग्रेसचे नेतृत्व बदलण्याच्या वक्तव्यामुळे वडिलांसोबत मलाही शिव्या मिळत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

शर्मिष्ठा मुखर्जी यांनी सांगितले की, जेव्हापासूनमी वडिलांच्या आठवणींवर पुस्तक लिहिले आहे, तेव्हापासून वाद निर्माण झाला आहे. वडील प्रणव मुखर्जी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. यावर काँग्रेसचे लोक नाराज आहेत. काँग्रेस पक्ष कोणतीही विशिष्ट व्यक्ती किंवा कुटुंबापेक्षा खूप मोठा आहे, हे कोणीच समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही.

वडील प्रणव मुखर्जी यांचे इंदिरा गांधी, डॉ.मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्याशीही चांगले संबंध होते. त्यांनी राहुल गांधींना राजकीयदृष्ट्या परिपक्व होण्याची गरज असल्याचे सांगितले होते. त्यात गैर ते काय होते? म्हणूनच काँग्रेसने आता गांधी घराण्यापासून दूर जाऊन इतर नेतृत्वाचा विचार करावा, असेही मी जयपूरमध्ये म्हटले होते. आता नवीन नेतृत्व निर्माण केले पाहिजे. जेव्हापासून मी हे बोललो तेव्हापासून काँग्रेस समर्थक सोशल मीडियावर अपशब्दात कमेंट करत आहेत.

…तर भूकंप होईल
शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या की, माझे वडील प्रणव मुखर्जी यांच्या डायरीत त्यांच्या ५० वर्षांच्या राजकीय प्रवासातील घटना आहेत. जीवनाचे सत्य त्यांनी लिहिले आहे. वडिलांच्या डायरीमध्ये अशा काही गोष्टी आहेत, ज्या सध्या सार्वजनिक डोमेनमध्ये आणण्यासाठी ही योग्य वेळ नाही. त्यातील काही गोष्टी तर इतक्या स्फोटक आहेत की, त्या जर उघड झाल्या तर राजकीय भूकंप होतील. माझी निष्ठा सोनिया गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्याशी नाही, तर माझ्या वडिलांशी आहे. त्यामुळे मी त्याची काळजी घेतली आहे.