बंडखोरी पडली महागात; राज्यातील या’ बड्या नेत्याला काॅंग्रेसने 6 वर्षांसाठी केले निलंबित

कोल्हापूर – कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून (Kolhapur Lok Sabha Election 2024) बंडखोरी करणारे काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे (Bajirao Khade) यांच्यावर काँग्रेसने 6 वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या निर्देशानंतर उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी ही कारवाई केली. (Congress rebel leader Bajirao Khade suspended for 6 years)

काॅंग्रेसने खाडे यांच्या निलंबनाचे पत्रक जाहीर केले आहे. त्यात लिहिले की, “लोकसभा 2024 च्या निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या विरुद्ध आपण बंडखोरी करुन अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहात. आपले हे कृत्य पक्ष शिस्तीचा भंग करणारे असल्याने प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशावरून आपणास काॅंग्रेस पक्षातून 6 वर्षाकरिता निलंबीत करण्यात येत आहे.”

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना डावलण्याचा आरोप बाजीराव खाडे यांनी पक्षावर केला होता. तसेच त्यांनी स्वाभिमानासाठी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली. काँग्रेसने त्यांची मनधरणी करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. पण खाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरत बंडखोरी केली.

दरम्यान, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांची महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्याशी थेट लढत होणार आहे. ओबीसी, वंचितसह एमआयएमनेही येथे शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे. छत्रपती शाहू महाराजांविरोधात बंडखोरी करणे खाडे यांना महागात पडले असून पक्षाने त्यांच्यावर 6 वर्ष निलंबनाची कारवाई केली आहे.