खोट्या आश्‍वासनांची कॉंग्रेसला शिक्षा मिळाली

फोर्बेसगंज/ सहारसा (बिहार) – दारिद्रय निर्मूलन आणि शेती कर्ज माफ करण्यासंदर्भात जनतेला खोटी आश्‍वासने दिल्याबद्दल लोकांनी कॉंग्रेस पक्षाला शिक्षा केली असून संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील या पक्षाचे संख्यबळ 100 पेक्षाही कमी झाले आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

बिहार विधानसभेच्या निवडणूकीसाठीच्या प्रचारातील अखेरच्या सभेदरम्यान मोदींनी राजद-कॉंग्रेसवर जोरदार टीका केली.

बिहारमध्ये पूर्वी ‘जंगलराज’ होते, याचीही मोदींनी आठवण करून दिली. बुथ ताब्यात घेणे, गरिबांना लालुच दाखवून अनुकूल मतदान करण्यास भाग पाडणे यासारख्या कुप्रथा बिहारमध्ये पूर्वी होत होत्या. मात्र मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात असुरक्षितता आणि अराजकतेचा अंधार दूर हटवला गेला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

दारिद्रय निर्मूलन, शेतकऱ्यांची कर्ज माफ करणे आणि वन रॅंक वन पेन्शनसारख्या महत्वाच्या मुद्दयांवर कॉंग्रेसने खोटी आश्‍वासने दिल्यामुळे जनता संतप्त झाली आहे. आता जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा जनतेकडून कॉंग्रेसला शिक्षा होत आहे. आता संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मिळून कॉंग्रेसचे 100 खासदारही राहिलेले नाहीत.

बिहारसारख्या राज्यात कॉंग्रेसचा क्रमांक तिसरा, चौथा लागतो. अस्तित्व दाखवण्यासाठी छोट्या पक्षांची मदत घ्यावी लागते आहे, अशा शब्दात त्यांनी कॉंग्रेसची खिल्ली उडवली.

‘डबल युवराज’ जनतेने नाकारले…

बिहारमधील आतापर्यंतच्या मतदानाचा कल पाहता जनतेने “डबल युवराज’नाकारले आहेत, असे दिसते आहे. कॉंग्रेसचे राहुल गांधी आणि राजदचे तेजस्वी यादव य दोघांनाही जनतेने नाकारले आहे.

भाजपने राज्यसभेतील 11 पैकी 9 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आता राज्यसभेतील भाजपचे संख्याबळ 92 तर कॉंग्रेसचे संख्याबळ 38 झाले आहेत. आता संसदेत कॉंग्रेसचे एकूण केवळ 89 खासदार आहेत. गुंडगिरी आणि खंडणीबहाद्दर पराभूत होत आहेत.

विकास, कायद्याच्या राज्याचा विजय होतो आहे. लोकशाहीकडून परिवारवादाचा पराभव होतो आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

Leave a Comment