सरकारला घेरण्यासाठी कॉंग्रेसचे “दुष्काळी अस्त्र’

नाशिक विभागीय उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी थोरात

नगर: राज्याच्या बहुतांश भागात तीव्र स्वरुपाची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाय योजण्यात राज्य सरकार कमी पडत आहे, असा ठपका ठेवत कॉंग्रेसने सरकारची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी विभागीय स्तरावर समिती नियुक्‍त केली असून या समितीला दौरा केल्यानंतर आपला अहवाल प्रदेश कॉंग्रेसकडे सादर करायचा आहे. नाशिक विभागीय उत्तर महाराष्ट्रा समितीच्या अध्यक्षपदी माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली आहे.

राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीवर आवश्‍यक उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरल्याने त्याची गंभीर दखल प्रदेश कॉंग्रेसने घेऊन विभागीय स्तरावर विशेष समित्या स्थापन करून त्यांच्याद्वारे दुष्काळ सुविधांसाठी आंदोलने, दुष्काळग्रस्तांना भेटून आवश्‍यक मदत व दिलासा देण्याचे ठरवले आहे. या अनुषंगाने नाशिक विभागीय उत्तर महाराष्ट्राच्या समितीच्या अध्यक्षपदी आ.थोरात यांची नियुक्ती केली गेली आहे. या समितीच्या समन्वयकपदी प्रदेश कॉंग्रेसचे महासचिव विनायक देशमुख यांची नियुक्‍ती केली आहे. या दोघांसह माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, तसेच उत्तर महाराष्ट्रातील नेते कुणाल पाटील, राजाराम पानगव्हाणे, निर्मला गावीत, पद्माकर वळवी, शिरीष कोतवाल, काशीराम पावरा, के. सी. पाडवी, धनाजी अहिरे अशी अन्य सदस्य मंडळी या समितीत आहेत.

प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाणांनी या समितीसह अन्य विभागीय समित्यांची घोषणा शनिवारी मुंबईत केली. यानुसार पश्‍चिम महाराष्ट्राच्या समितीची जबाबदारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर, विदर्भाची जबाबदारी विजय वडेट्टीवार यांच्यावर, तर मराठवाड्याची जबाबदारी बसवराज पाटील व मधुकर चव्हाणांवर देण्यात आली आहे.


विखेंऐवजी आता थोरात
नाशिक विभागीय उत्तर महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे होते. परंतू लोकसभा निवडणुकीत विखे यांनी कॉंग्रेसपासून दूर राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी अद्याप कॉंग्रेस सोडली नाही. आणि पक्षाने देखील त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. असे असतांना विखेंना पक्षाने देखील दूर ठेवण्याची भूमिका घेवून विखेंऐवजी थोरातांवर जबाबदारी टाकली आहे.

Leave a Comment