वाढत्या तापमानामुळे पाणीसाठ्यात सतत घट; राज्यावर पाणीटंचाईचेही संकट

मुंबई – राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण आहेत. अशात राज्यावर पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. सतत वाढणाऱ्या विक्रमी उष्णतेमुळे धरणांतील 27 टक्के पाणीसाठी आटला आहे. यामुळे नागरिकांना वापरासाठी आता केवळ 44 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मुंबईतील धरणांमध्ये 27 टक्के, तर ठाणे जिल्ह्यातील धरणांमध्ये 45 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वाढत्या तापमानामुळे पाणीसाठ्यात सतत घट होत असून परिणामी येत्या काही दिवसांत नागरिकांना पाणी टंचाईचे संकट सोसावे लागणार आहे.

ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरसह नवी मुंबईतील अनेक भागात पाणी टंचाईची झळ सोसावी लाग आहे. ही झळ पुढील दिवसात आणखी तीव्र होण्याची शक्‍यता आहे. ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात सध्या 45 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच उल्हास नदीची पाणी पातळीही समाधानकारक आहे. मात्र वितरण व्यवस्थेतील अडचणींमुळे ठाणेकर पाणी टंचाईचा सामना करत आहेत. तर मुंबईतही मुबलक पाणी पुरवठा असल्याने पावसाळ्यापर्यंत नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होईल असे सांगितले जात आहे. मात्र तापमान अजून वाढले तर मुंबईकरांवरही पाणी टंचाईची टांगती तलवार असणार आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुलशी या सात तलावांमध्ये चार लाख 646 दशलक्ष लिटर इतका जलसाठा शिल्लक राहिला असून तलावांमधील वापरायोग्य पाणी सरासरी 28.68 टक्के आहे.

मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्यात विक्रमी तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटा आल्या. सर्व भागात दिवसाचे कमाल तापमान सातत्याने तुलनेने अधिक राहिले. त्यामुळे शेतासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज वाढली, तर दुसरीकडे उष्णता वाढत असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते. परिणामी दोन महिन्यात राज्यांतील धरणातील पाणी साठा मोठ्याप्रमाणात कमी झाला.

गतवर्षाच तुलनेने कमी पाणीसाठा
2 मार्च रोजी राज्यातील धरणांमध्ये 71 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मात्र सर्व विभागांमध्ये गतवर्षाच तुलनेने पाणीसाठा कमी झाला. पुण्यात तुलनेने सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक आहे. पंधरा दिवसांपूर्वी पुण्यात 57 टक्‍क्‍यांहून अधिक पाणीसाठा होता. तो 38 टक्‍क्‍यांपर्यंत घसरला आहे. तर नागपूरात 40 टक्के, तर नाशिक विभागात 43 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तर नाशिकसह, अमरावती, कोकण आणि औरंगाबाद या विभागांतही गतवर्षीपेक्षा धरणांतील पाणीसाठा कमी झाला आहे.