सातारा – बाजार समिती सभापती-मुख्याधिकाऱ्यांमध्ये वादावादी

कराड –  कराड बाजार समिती समितीची संरक्षक भिंत पाडण्यावरून सभापती, संचालक आणि कराड पालिकेचे मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शुक्रवारी वादावादी झाली. दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, व्यापारी, स्थानिक नागरिक आमनेसामने आल्याने, काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

कराड बाजार समिती परिसरातील नागरिकांनी मोर्चा काढत रस्त्याची मागणी केल्यानंतर, संरक्षक भिंत पाडण्यासाठी मुख्याधिकारी शंकर खंदारे हे पालिकेच्या पथकासह पोलीस बंदोबस्तात शुक्रवारी सकाळी बाजार समिती आवारात दाखल झाले. बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम, संचालक आणि व्यापारीही दाखल झाले.

संरक्षक भिंत पाडण्याचा आणि रस्त्याबाबतचा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश आधी दाखवा आणि मगच भिंत पाडा, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यावर, आपल्याकडे लेखी आदेश नसून जिल्हाधिकाऱ्यांनी तोंडी आदेश दिला आहे. लेखी आदेशाची गरज नसल्याचे सांगत खंदारे यांनी कारवाईला सुरुवात केली. बाजार समिती सभापती, संचालक व व्यापाऱ्यांनी त्यास विरोध केला. यावेळी वादावादी सुरू झाल्यावर पोलिसांनी हस्तक्षेप करून, दोन्ही बाजूंना शांततेचे आवाहन केले.

उदयसिंह पाटील यांनी केली व्यापाऱ्यांची मनधरणी
बाजार समितीत झालेल्या वादावादीनंतर ऍड. उदयसिंह पाटील यांनी व्यापाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी व्यापाऱ्यांची मनधरणी केली. येत्या काळात सण, उत्सव आहेत. या काळात व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यास नागरिकांची गैरसोय होणार आहे. ही गैरसोय होऊ नये, म्हणून व्यापाऱ्यांनी व्यवसाय सुरू ठेवावेत, अशी विनंती ऍड. पाटील यांनी केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप
कारवाईसाठी आलेल्या पालिका अधिकाऱ्यांसोबत वाद सुरू असताना सभापती विजयकुमार कदम यांनी या प्रकरणाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. आम्ही आठ दिवसांत दहा पत्रे दिली. व्यापाऱ्यांना सोबत घेऊन भेटायला गेलो. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून काहीच प्रतिक्रिया दिली जात नाही. चर्चाही केली जात नाही. लेखी आदेशाऐवजी केवळ तोंडी आदेश देतात का, असा सवाल कदम यांनी केला.