करोनापासून बचावासाठी प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करा

सातारा  – करोनाच्या संकटात ग्रामीण भागांमध्ये आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य यंत्रणेने नेमून दिलेले काम करत आहेत. घरोघरी जाऊन ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करणाऱ्या या सर्व जनसेवकांच्या आरोग्याची आणि करोनापासून संरक्षणाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यांना जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

जावळी तालुक्‍यातील 125 गावांमध्ये जाऊन 146 आशा स्वयंसेविका ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करत आहेत. या महिला कर्मचाऱ्यांना आणि पंचायत समिती, आरोग्य विभागातील कर्मचारी, पोलिसांना अजिंक्‍यतारा साखर कारखान्याने उत्पादित केलेल्या हॅंड सॅनिटायझरचे वाटप आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, तहसीलदार शरद पाटील, मेढ्याचे सहायक पोलीस निरीक्षक नीळकंठ राठोड, गटविकास अधिकारी सतीश बुधे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान मोहिते उपस्थित होते. दरम्यान, करोनापासून आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी घरीच राहावे. विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आ. शिवेंद्रराजे यांनी केले आहे.

Leave a Comment