पुणे | काॅपीमुक्त अभियान, तरीही ५८ प्रकरणे

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – काॅपीमुक्त अभियानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त आणि सुरक्षेच्या वातावरणात राज्यासह पुण्यात बुधवारपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरू झाली. पहिलाच पेपर इंग्रजी विषयाचा होता. यात राज्यात काॅपी आणि संबंधित गैरप्रकाराची ५८ प्रकरणे समोर आली.

दरम्यान, पेपरला येणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण करुन गुलाब पुष्प देत जल्लोषात स्वागत करण्यात आले. बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. परीक्षा केंद्रावरही जय्यत तयारी ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्याबाबतचे आकर्षक फलकही लावण्यात आले होते. पाल्यास परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी पालकांनीही गर्दीही केलेली होती.

परीक्षेच्या दीड तास आधीपासून आधी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर हजर होते. भावे हायस्कुलसह अन्य केंद्रावर विद्यार्थ्यांचे पारंपारिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. विद्यार्थ्यांची कसून तपासणी करुनच त्यांना केंद्रात प्रवेश दिला जात होता. विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सूचनाही देण्यात येत होत्या. विद्यार्थ्यांचे परीक्षेबाबतचे दडपणही कमी करण्यासाठी करण्याला प्राधान्य देण्यात आले.

पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर होता. पेपर कसा असेल याबाबत विद्यार्थ्यांना आधी पासूनच धाकधुक लागली होती. मात्र पेपर सोपा असल्याने विद्यार्थ्यांचे टेन्शन दूर झाल्याचे पहायला मिळाले. पेपरसाठी दहा मिनिटांचा जास्तीचा वेळ दिल्यामुळे त्याचा विद्यार्यांना फायदाच झाला. लिखाणाचा वेग कमी असलेल्या काही विद्यार्थ्यांना मात्र पूर्ण पेपर सोडविता आलाच नाही.

पथकेही तैनात
इयत्ता बारावीच्या परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी भरारी पथकासह अन्य पथकेही तैनात करण्यात आली होती. विद्यार्थ्यांची कसून तपासणी करुन त्यांना परीक्षा केंद्रात सोडण्यात आले होते. असे असतानाही राज्यात इंग्रजीच्या पेपरला कॉपी करण्याची ५८ प्रकरणे सापडली.

विभागनिहाय काॅपी प्रकरणे
पुणे – १५
छ. संभाजीनगर-२६
नाशिक – २
लातूर – १४
नागपूर – १