Corona : करोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे डोकेदुखी वाढली ! रुग्णसंख्येत झाली झपाट्याने वाढ

Corona : कोविडचा नवा व्हेरियंट भारतातही दाखल झाला असून ८ जानेवारीपर्यंत देशाच्या १२ राज्यांमध्ये या नव्या विषाणूचे ८१९ नवीन रूग्ण आढळून आले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जेएन. १ या नव्या व्हेरियंटचे रूग्ण भलेही वाढत असले तरी त्याची फारशी चिंता करण्याचे कारण नाही. कारण ज्यांना याची लागण झाली आहे त्यातील बहुतांश जणांनी घरीच उपचार घेण्यास प्राधान्य दिले आहे. याचाच अर्थ नवा विषाणू फारसा घातक नसल्याचे त्यातून प्रतित होते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात २५०, कर्नाटकात १९९, केरळमध्ये १४८, गोव्यात ४९, गुजरातमध्ये ३६ आंध्र प्रदेश आणि राजस्थाानात प्रत्येकी ३०, तमिळनाडू आणि तेलंगणात प्रत्येकी २६, दिल्लीतून २१ नवे रूग्ण आढळून आले आहेत. हरियाणा आणि ओडिशात नव्या व्हेरियंटचा प्रत्येकी एक रूग्ण आढळला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार देशात ४७५ नवे रूग्ण आढळून आले आहेत. तसेच गेल्या २४ तासांत सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कर्नाटकात ३, छत्तीसगडमध्ये २ तर आसाममध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जेएन. १ च्या संदर्भात एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की याचा वेगाने प्रसार होत नसून रूग्णांना रूग्णालयात दाखल व्हावे लागण्याची आवश्‍यकताही भासत नसल्यामुळे ही दिलासा देणारी बाब ठरली आहे.

भारतात करोनाच्या एकूण तीन लाटा आल्या होत्या. यातील एप्रिल- जून २०२१ मधील डेल्टा व्हेरियंटची लाट सगळ्यांत घातक ठरली होती. त्या काळात रूग्णसंख्या तर वाढलीच होती, मात्र मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. ही लाट अगदी शिखरावर असताना ४, १४,१८८ नव्या रूग्णांची नोंद झाली होती व त्याच सुमारास ३,९१५ मृत्यूंची नोंद झाली होती.