भारतात करोनानं टेन्शन वाढवलं.! नागरिकांनी लसीचा चौथा डोस घ्यावा का? तज्ज्ञांनी दिलं स्पष्ट उत्तर

नवी दिल्ली – जगाला धडकी भरवणारा करोना जिथून जन्माला आला त्याच चीनमध्ये पुन्हा एकदा या व्हायरसने डोके वर काढले आहे. त्यातच इथल्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच पार्श्वभुमीवर भारतात देखील खबरदारीचे उपाय राबवण्यात येत असून, आरोग्य प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. मात्र, करोनाचा धोका वाढत असताना पुन्हा एकदा करोना प्रतिबंध लस घ्यायची का? हा मुद्दा चर्चेत आला आहे.

अश्यातच, बुधवारी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडाविया यांनी उच्चस्तरीय बैठक घेत देशातील करोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी लसीकरणाचा देखील आढावा घेण्यात आला आहे. देशातील फक्त २७ टक्के लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे. याविषयी बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी टास्क फोर्सच्या सदस्यांनी नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे, असं अवाहन केलं आहे.

दरम्यान, नागरिकांनी करोना लसीचा चौथा डोस घ्यावा का? असा प्रश्न उपस्थित होत असताना एम्सचे माजी डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी यावर महत्त्वाचे भाष्य केलं आहे. नागरिकांनी लवकरात लवकर लशीचा बुस्टर डोस घेण्याची गरज आहे. केंद्र सरकारकडूनही बुस्टर डोसवर भर देण्यात येत आहे. असं ते म्हणाले. तसेच यावेळी लशीचा चौथ्या डोसबाबतही गुलेरिया यांनी माहिती दिली आहे. तसेच, जोपर्यंत बायवेलेंट लस येत नाही तोपर्यंत चौथा डोस घेण्याची आवश्यकता भासणार नाही, असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

देशातील करोना रुग्णवाढीवर आदर पुनावाला म्हणाले….

‘चीनमधील कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या बातम्या चिंताजनक आहेत. परंतु आपलं उत्कृष्ट लसीकरण मोहीम आणि ट्रॅक रेकॉर्ड पाहता घाबरण्याची गरज नाही. भारत सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर आपण विश्वास ठेवून त्यांचं पालन केलं पाहिजे.’ असे आदर पूनावाला यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.