दिलासादायक : करोना लसीचा एक डोस मृत्यू रोखण्यात ८२ टक्के सक्षम; संपूर्ण लसीकरणानंतर ९५ टक्के संरक्षण

वृत्तसंस्था – जगभरात करोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. भारतात सुद्धा करोनाचा विळाखा घट्ट बसलेला बघायला मिळाला आहे. करोनाने अनेकांचा बळी घेतला आहे. या जिवघेणा विषाणूवर एकमेव उपाय तो म्हणजे लस. देशात लसीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे. मात्र लसीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. असे असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे.

करोना लसीचा एक डोस कोरोना विषाणूपासून होणारे मृत्यू थांबवण्यात ८२ टक्के प्रभावी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर करोना लसीचे दोन डोस हे ९५ टक्के प्रभावी असल्याचं समोर आले आहे. याबाबत इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च- नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीने (ICMR-NIE) संशोधन केले यामधून ही दिलासादायक माहिती समोर आली आहे.

या संशोधनामध्ये लसीकरण झालेल्या आणि लसीकरण न झालेल्या व्यक्तींच्या मृत्यूचा अभ्यास करून करोना लसीशी निगडीत मोर्टेलिटी रिस्क मोजण्यात आली. यानुसार करोना लसीचा एकही डोस न घेतलेल्या १ हजार जणांच्या मागे १.१७ लोकांचा मृत्यू झाला. तर एक डोस घेतलेल्यांमध्ये ही संख्या ०.२१ आणि दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये ही संख्या ०.०६ इतकी होती. आयसीएमआर-एमआयआयचे अध्यक्ष डॉ. मनोहर मुर्हेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.