जाणून घ्या : लस घेतल्यानंतर कोणाला गंभीर साईड इफेक्ट्स तर कोणाला काहीच होत नाही… असं का होतं?

corona vaccine side effects – जगभरात सध्या करोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. सार्स कोव्ह – २ या नव्या प्रकारच्या करोना विषाणूवरील लसी परिणामकारक असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. लसींमुळे विषाणूच्या गंभीर संसर्गाला आळा बसत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र कोणतीही लस घेतल्यानंतर तिचे काही दुष्परिणाम (साईड-इफेक्ट्स) दिसून येत असतात. असेच साईड-इफेक्ट्स करोना लस घेतल्यानंतर देखील दिसत आहेत. 

करोना लस घेतल्यानंतर काहींना सामान्य, काहींना मध्यम स्वरूपाचे तर काहींना गंभीर स्वरूपाचे साईड-इफेक्ट्स जाणवतात. तर लस घेतलेल्या काही व्यक्तींना कोणतेच साईड-इफेक्ट्स जाणवत नाहीत. पण असं का होतं? जाणून घेऊयात…            

साईड-इफेक्ट्स म्हणजे काय? आणि ते जाणवणं सामान्य असतं का?

तुमच्या शरीरामध्ये जेव्हा अँटीजेन (ऍटिबॉडीज निर्माण करण्यासाठी रक्ताला उत्तेजित करणारा पदार्थ) सोडले जातात तेव्हा तुमच्या शरीराने त्याला दिलेली प्रतिक्रिया म्हणजेच साईड-इफेक्ट्स. अँटीजेन शरीरात प्रवेश करताच तुमचे शरीर त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होते.

प्रथम पांढऱ्या पेशी त्याच्याशी लढा देतात. यासोबतच काहींना लस घेतल्यानंतर ताप, थकवा, स्नायू दुखणे, वेदना, थंडी वाजणे अशा तक्रारी जाणवू लागतात. हे लसीचे ‘कॉमन’ अर्थात सामान्य साईड-इफेक्ट्स म्हणून देखील ओळखले जातात.

तर काहींमध्ये यापेक्षा वेगळे साईड-इफेक्ट्स देखील पाहायला मिळतात.

तुमचे शरीर लसीला कसा प्रतिसाद देते यावर साईड-इफेक्ट्स अवलंबून असतात

लस घेतल्यानंतर काही साईड-इफेक्ट्स जाणवणं सामान्य मानलं जात असलं तरी, कोणाचं शरीर कोणत्या प्रकारचे साईड-इफेक्ट्स दाखवेल हे काही सांगता येत नाही. तसेच वेगवेगळ्या लसी घेतल्यानंतर वेगवेगळे साईड-इफेक्ट्स जाणवू शकतात. उदाहरण द्यायचं झाल्यास कॉव्हॅक्सिन घेतल्यानंतर ताप येण्याचं प्रमाण कोव्हीशील्ड लसीपेक्षा अधिक आहे.

फायझर एमआरएनए लसीच्या क्लिनिकल ट्रायलचा अभ्यास केल्यानंतर ५० टक्के लोकांना कोणतेही साईड इफेक्ट्स जाणवले नाहीत तसेच त्यांचं करोना विषाणूपासून रक्षणही झालं असं निदर्शनास आलं.

काही संशोधनांमधून असंही लक्षात आलं आहे की, तुम्ही लस कोणत्यावेळी घेता यावरही साईड इफेक्ट अवलंबून असतात.

साईड इफेक्ट्स महिलांमध्ये अधिक 

लसीकरणाबाबत उपलब्ध होत असलेल्या माहितीवरून असं लक्षात येतंय की, साईड इफेक्ट्स व लस ही महिला व पुरुषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे काम करते. महिलांमध्ये लस घेतल्यानंतर तीव्र स्वरूपाच्या साईड इफेक्ट्सचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे.

हार्मोन रिस्पॉन्समुळे लस घेतल्यानंतर महिलांमध्ये दिसणारे साईड इफेक्ट्स हे पुरुषांपेक्षा वेगळे असल्याचं देखील  समोर येतंय. यामध्ये काखेतील लस ग्रंथींमध्ये सुजन या साईड इफेक्टचा देखील समावेश आहे. तसेच महिलांमध्ये लसीनंतर निर्माण झालेले साईड इफेक्ट्स हे पुरुषांपेक्षा अधिक काळ राहिल्याचं निदर्शनास आलं आहे.

जर तुम्हाला साईड इफेक्ट्स जाणवलेच नाहीत तर ते काळजी करण्यासारखं आहे का?

लस घेतल्यानंतर जर तुमच्या शरीरामध्ये कोणतेही साईड इफेक्ट्स निर्माण झाले नाहीत तर त्यामध्ये चिंता करण्यासारखं काहीही नाही असं तज्ज्ञ सांगतात. मुळात साईड इफेक्ट्स हे तुमचे शरीर लस घेतल्यानंतर काय प्रतिक्रिया देत यावर अवलंबून असल्याने काहींना साईड इफेक्ट्स जाणवू शकतात तर काहींना नाही.

लस घेतल्यानंतर तुमच्या शारीमध्ये अँटीबॉडीज निर्माण झाल्या आहेत व तुम्ही विषाणू संसर्गासंबंधातील सुरक्षिततेच्या उपायांचे पालन करत आहात तर तुम्हाला काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.