OMICRON : कर्नाटकात मंगळवारपासून 10 दिवस रात्रीची संचारबंदी

बेंगळुरू – कोरोनाव्हायरसचे नवीन स्वरूप असलेल्या ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने 28 डिसेंबरपासून 10 दिवसांसाठी रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. तसेच नवीन वर्षाच्या उत्सवावर देखील काही निर्बंध घालण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री के सुधाकर यांनी रविवारी दिली.

28 डिसेंबरपासून रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत 10 दिवस कलम 144 लागू असेल. तसेच नवीन वर्षानिमित्तच्या कार्यक्रमांसाठी लोकांना एकत्र येण्यासही बंदी असेल. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री, अधिकारी आणि कोविड तांत्रिक सल्लागार समितीच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर आरोग्यमंत्री सुधाकर यांनी ही माहिती दिली.

“ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे तसेच डीजे वापर करणाऱ्या कार्यक्रमांना बंदी असेल. तसेच भोजनालये, हॉटेल, पब आणि रेस्टॉरंटमधील परिसराची क्षमता केवळ 50 टक्के लोकांना बसण्याची परवानगी असेल.” अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. दरम्यान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक सहित आता 12 राज्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.