बँकिंग क्षेत्रातील करोना वॉरिअर : शिवाजी कृपा सिंघ

 जनार्दन लांडे, शेवगाव (प्रतिनिधी) – मुंबईसारख्या स्वप्ननगरीत आयुष्य गेले असताना ग्रामीण अर्थव्यवस्था समजावी म्हणून नोकरीनिमित्त शेवगावी  येणे झाले  आणि अवघ्या वर्षभराच्या कालावधीत कर्तव्यनिष्ठेला प्राधान्य देण्याच्या स्वभावामुळे शेवगावकरांच्या गळ्यातील ताईत बनला. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य पार पाडताना दिवसाआड शेवगाव ते ढोरजळगाव असा जाऊन येऊन तब्बल ३८ किलो मिटरचा सायकल प्रवास करणारा सहाय्यक प्रबंधक, बँकिंग क्षेत्रातील करोना वॉरिअर शिवाजी कृपा सिंघ सर्वांचे लक्ष वेधून घेतो आहे.

करोना महामारी मुळे झालेल्या लॉक डाऊनच्या काळात सर्वसामान्याचे जनजीवन सुरळीत चालावे म्हणून महसूल पोलिस प्रशासन, वैद्यकीय सेवा, स्वच्छता, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यासह  पोस्ट आणि बँकिंग सेवा जोखीम घेऊन सातत्याने कार्यरत आहेत. यातील पहिल्या काही सेवा बद्दल नेहमीच कौतुक होत असते. पुरवठ्याबाबत तक्रारीचा सूर अधिक असतो तर पोस्ट आणि बँकिंग क्षेत्राची सहसा कोणी दखल घेत नाहीत. अशी स्थिती आहे मात्र लॉक डाऊन च्या काळात अन्य व्यवहार बंद असले तरी बँकिंग क्षेत्रातील लोक घरापासून दूर राहून अखंड सेवेत कार्यरत असतात, बँकिंग क्षेत्रात काम करताना स्लिप, चेक देण्या-घेण्यापासून प्रत्यक्ष पैसे देताना- घेताना असे अनेक व्यवहार करताना संक्रमणाचे धोके आहेत अशा बँकिंगच्या क्षेत्रातील येथील करोना योध्दा शिवाजी सिंघ याचे काम निश्चितपणे कौतुकास्पद आहे.

भारतीय सैन्यदलातील सतरा वर्षाच्या सेवेची शिदोरी शिवाजी या करोना योध्याच्या पदरी आहे. शिवाजी मूळचा बिहारचा. वडिल नोकरीनिमित्ताने मुंबईत येऊन स्थायिक झाले. शिवाजीचा जन्म मुंबईचा. येथील वास्तव्याने महाराष्ट्रीयन संस्कृतीसी एकरूप झालेल्या सिंघ कुटुंबाने ठेवलेले शिवाजी नाव  त्याने आपल्या आचरणाने सार्थ ठरवले आहे. सैन्यातील निवृत्तीनंतर शिवाजी भारतीय स्टेट बँकेत  क्लिरिकल पोस्टवर रूजू  झाला. मात्र लगेच परीक्षा देऊन तो सहाय्यक प्रबंधक झाला. अधिकारी झाला म्हणून त्याची सेवावृत्तीची नाळ तुटली नाही. ग्रामीण  भागाची  बँकिंग अर्थव्यवस्था समजावी, नोकरीचा हा एक भाग म्हणून  त्याची शेवगावला स्टेट बँकेत नियुक्ती झाली आहे.

सध्या शेवगावच्या शाखेत कर्ज वितरण विभाग सांभाळतो आहे. तर एक दिवसाआड  ढोरजळगावच्या शाखेचे शाखाधिकारी म्हणून कामही त्याला पहावे लागत आहे. कोवीड १९ मुळे लॉक डाऊन झाल्याने बसेस बंद आहेत. बँकेची मोटरसायकल आहे. पण त्यास मोटरसायकल येत नाही. त्यावरही त्याच्या  स्वभावानुसार  त्याने मात केली आहे. शेवगाव ते ढोरजळगाव जाऊन येऊन तब्बल ३८ किलोमीटर अंतर तो सायकलवर पार करतो. पण कर्तव्यात कसूर होऊ देत नाही. उशीर झाला म्हणून कोणाचीही सहानुभूती त्यास नको आहे. म्हणून वेळे आधीच तो बँकेत उपस्थित असतो.

कामामुळे त्याचे अनेकांशी उत्तम संबंध प्रस्थापित झाले आहेत. त्याने म्हटले तर त्यास कोणीही ढोरजळगाव शाखेत नेऊन सोडतील व आपल्या वाहनातून परतही आणतील. मात्र तो तसे करत नाही. असा हा बँकिंग क्षेत्रातील आगळावेगळा करोना वॉरिअर, शहरी असूनही ग्रामीण संस्कृतीशी एकरूप झालेला, शिवाजी नावाप्रमाणेच अडलेल्या गांजलेल्याना मदत करणारा, नियमात बसेल तेवढे भरभरून देणारा, अनोखा करोना योद्धा.

शिवाजीने पन्नाशीही पुरी केलेली नाही, काहीसे  रांगडे व्यक्तिमत्व. त्यास सायकल वर जाताना पाहिले की कुतुहलाने चौकशी केली जाते.  शिवाजीचे वृद्ध आई-वडील, शिक्षण घेत असलेले  मुलगा, मुलगी  आणि त्या सर्वांची मुंबई महानगरीत काळजी घेत कुटुंबाची देखभाल करणारी गृहिणी(धर्मपत्नी) अशी  कौटुंबिक स्थिती. अशावेळी स्वतःच्या घरी राहणे कोणीही पसंत  करेन. मात्र भारतीय सैन्य दलाच्या मुशीत तयार झालेल्या शिवाजीने सातत्याने कर्तव्यनिष्ठेला प्राधान्य दिले आहे. बँकेचे काम संपवून घरी आल्यानंतर रोज रात्री जेवणापूर्वी  घरची  खुशाली विचारतो. आपल्या वृद्ध आई-वडिलांसी त्यांच्या प्रकृती संबधी , मुलांबरोबर त्यांच्या सुरु असलेल्या ऑनलाईन अभ्यासाबाबत आणि अर्धांगिनीबरोबर काही अडचणी बाबत बोलल्यानंतरच तो निश्चींत होतो.

Leave a Comment