कोरोनामुळे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम ; जागतिक पर्यावरण दिन

पुणे : आज ५ जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. संयुक्त राष्ट्रांनी १९७४ सालापासून ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. पर्यावरणाचे महत्व पटवून देणारा हा दिवस दरवर्षी वृक्षारोपणासारखे विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा केला जातो. हा दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे पर्यावरणाशी निगडित असलेले विषय, घटक आणि समस्या यांच्याकडे सर्वांचे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे. आणि त्यावर योग्य त्या उपाययोजना करत महत्वाची पाऊले उचलणे असा आहे. त्याचप्रमाणे या दिनासाठी दरवर्षी एक थीमदेखील ठरवलेली असते. यावर्षीची थीम आहे ‘बायोडायव्हर्सिटी’ म्हणजेच जैवविविधता.

परंतु यावर्षी आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे मानवाच्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणावरील होणारा दुष्परिणाम कमी झालेला आहे. परिणामी काही महिन्यांमध्येच कित्येक वर्षांपासून प्रदूषणात पडलेली भर झपाट्याने कमी होण्यास मदत झाली. मानवाने बुद्धीच्या जोरावर पर्यावरणावर आपले वर्चस्व गाजवता गाजवता त्याला पर्यावरणाचा दर्जा टिकवून ठेवण्यात अपयश आल्याचे वारंवार दिसून आले आहे. दिल्ली, मुंबई – पुण्यासारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये वाढलेल्या प्रदूषणामुळे त्याचा गंभीर परिणाम तेथील नागरिकांच्या आरोग्यावर कळत नकळत होतो आहे.

आज जगभरात कोरोनाने दहशत माजवली असताना दुसरीकडे पर्यावरणावर त्याचा सकारात्मक परिणाम झालेला दिसून येत आहे. वाढती लोकसंख्या,औद्योगिकरण, बदलती जीवनशैली याचा थेट परिणाम पर्यावरणावर होतो. लॉकडाऊन मुळे प्रवास, उद्योगधंदे ठप्प पडले. आणि पाहता पाहता हवेतील प्रदूषण कमी झाले. हवा शुद्ध झाली. अनेकांनी सोशल मीडियावर लॉकडाऊन पूर्वी आणि लॉकडाऊन दरम्यानचे फोटोज शेयर करत कशाप्रकारे प्रदूषण कमी झाले याचा पुरावाही दिला आहे. मानवाने योग्य प्रमाणात हस्तक्षेप केल्यास निसर्ग देखील खुलतो हेच यावरून स्पष्ट होते.

Leave a Comment