केंद्राचा दिलासा; बूस्टर डोससाठीचा कालावधी ‘इतक्या’ महिन्यांनी केला कमी

दिल्ली – देशात करोना प्रतिबंधक लसीकरणाने 190 कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे करोना संसर्गाचा धोका कमी झाला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून आले. त्यामुळे तिसऱ्या लाटेत ऑक्‍सिजन आणि व्हेन्टिलेटरवर रुग्ण जाण्याचे प्रमाण घटले. तर, घरीच उपचार घेऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता.

याशिवाय, 2020 आणि 2021 च्या तुलनेत सर्वसामान्यांमध्ये असलेली करोना संसर्गाविषयीची भीतीदेखील कमी झाली. दरम्यान, करोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट अधिक वेगाने पसरत असल्याचे अभ्यासातून समोर आले होते. यावर लसीचा बूस्टर डोस प्रभावी असल्याचे सांगत तज्ज्ञांकडून करोना प्रतिबंधक लसीची तिसरी मात्रा देण्याची मागणी होत होती. त्यानंतर केंद्र शासनाकडून बूस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यावेळी दुसऱ्या आणि बूस्टर डोस यांच्यातील अंतर 9 महिन्यांचे होते.

पण आता दुसरा डोस आणि बूस्टर डोसमधील अंतर कमी करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बूस्टर डोससाठी अंतर आता 9 महिन्यांवरून 6 महिने केले आहे. म्हणजे करोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर आता 9 ऐवजी 6 महिन्यांनी तुम्हाला हा बूस्टर डोस घेता येणार आहे. त्यामुळे तिसऱ्या डोससाठी 9 महिने लांबलचक प्रतीक्षा आता थोडी कमी झाली आहे.

Corona In Maharashtra: राज्यात अॅक्‍टिव्ह रुग्णसंख्या 20 हजारांच्या पार

त्यामुळे आता 18 ते 59 वयोगटातील व्यक्तींना दुसऱ्या डोसनंतर सहा महिन्यांनी तिसरा डोस अर्थात बूस्टर डोस घेता येईल. हा बूस्टर डोस या लाभार्थ्यांना प्रायव्हेट कोविड व्हॅक्सिनेशन सेंटरवर अर्थात खासगी लसीकरण केंद्रांवर सशुल्क घेता येईल. तर 60 वर्षांवरील नागरिक आणि फ्रन्ट लाईन वर्कर्संना सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत बूस्टर डोस घेता येईल.

Corona updates : राज्यात दिवसभरात 5,218 रुग्णांची भर