सावधान ! करोनाचा तांडव रोखण्यासाठी मोदी सरकार ऍक्शन मोडमध्ये; पुन्हा एकदा देशव्यापी ‘लॉकडाऊन’?

नवी दिल्ली : देशात करोनाचा वाऱ्यासारखा पसरत आहे. देशातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होताना दिसत आहे. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत असतानाच देशात नव्या विश्वविक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. यातही धक्कादायक गोष्ट म्हणजे देशातील मृत्यूंची संख्याही झपाट्याने वाढली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६१ हजार ५०० करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत १ लाख ३८ हजार ४२३ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशासाठी चिंतेची बाब म्हणजे मृतांच्या संख्येत २४ तासांतच मोठी वाढ झाली आहे. देशात १ हजार ५०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या १ लाख ७७ हजार १५० वर पोहोचली आहे.

यातच मिळालेल्या माहितीनुसार, करोनाच्या या चेन ला ब्रेक करण्यासाठी मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तशी तयारी केंद्रानं केली असून दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधला. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे या बैठकीला उपस्थित होते. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी  देशातल्या कोविड रुग्णसंख्या वाढत असलेल्या 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधींसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. 

या बैठकीत कोविड-19 च्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर, कोविड प्रतिबंधक क्षेत्रे आणि व्यवस्थापन याविषयीच्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीत, महाराष्ट्र, छत्तिसगढ, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, केरळ, पश्‍चिम बंगाल, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तरप्रदेश या राज्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. बहुतांश राज्याचे आरोग्य मंत्री, प्रशासनातील आयएएस दर्जाचे अधिकारी आणि उच्च पदस्थदेखील बैठकीला हजर होते.  गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. त्यामुळे  लवकरच मोदी सरकार संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान,  पहिल्या लाटेपेक्षा करोनाची दुसरी लाट भयानक आहे. युके, दक्षिण, ब्राझील या देशात आढळून आलेल्या करोनाच्या नव्या स्ट्रेनसह डबल म्युटेशनही भारतात आढळून आलं असून, त्यामुळे परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत चालली आहे. 12 एप्रिल रोजी देशात एका दिवसांत सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदली गेली. ही रुग्णसंख्या एका दिवसातली जगातली सर्वाधिक संख्या होती, असेही यावेळी सांगण्यात आले. या सर्व 11 राज्यांनी त्यांच्या दररोजच्या सर्वाधिक रुग्णसंख्येची क्षमता आधीच ओलांडली असून काही जिल्हे, जसे मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, ठाणे, लखनौ, रायपूर, अहमदाबाद आणि औरंगाबाद मध्येही हीच स्थिती उद्भवली आहे.

 

 

 

Leave a Comment