राज्यातील निर्बंधांना 1 मेनंतर मुदतवाढ?

मुंबई – करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात चालू महिन्याच्या अखेरपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्या निर्बंधांना 1 मेनंतर मुदतवाढ मिळू शकते, असे संकेत खुद्द राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिले.

राज्य सरकार निर्बंध लागू करण्यात आल्यानंतरच्या स्थितीचा आढावा घेत आहे. करोना फैलाव रोखण्यासाठीच्या निर्बंधांचे जनता पालन करत असल्याने मान्य करावे लागेल. मात्र, निर्बंधांचे उल्लंघन होत असल्याच्या काही घटनाही समोर येत आहेत. त्यामुळे स्थिती पाहून त्या निर्बंधांना मुदतवाढ दिली जाऊ शकते. अर्थात, पंधरा दिवसांतील स्थितीचा आढावा घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे टोपे जालना येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 एप्रिल या दिवशी राज्यभरात 15 दिवसांची संचारबंदी जाहीर केली. त्याकडे लॉकडाऊनसदृश निर्बंध म्हणून पाहिले जात आहे. ते निर्बंध 1 मेपर्यंत लागू असतील. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रातील स्थिती चिंता वाढवणारी ठरली आहे. करोनाबाधितांच्या दैनंदिन वाढीत राज्य सध्या देशात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, मागील वर्षीच्या लॉकडाऊननंतर पुन्हा व्यापक निर्बंध लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे.

Leave a Comment