दस्त नोंदणी कार्यालयांना कॉर्पोरेट लूक; अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त इमारती उभारणार

पुणे -जिल्ह्यातील दस्त नोंदणी कार्यालये अर्थात दुय्यम निबंधक कार्यालयाचे रुपडे आता बदलणार आहे. जिल्ह्यात नव्याने करण्यात येणाऱ्या अत्याधुनिक कार्यालयांमध्ये प्राथमिक सुविधांबरोबर नागरिकांना हव्या असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात लोणावळा, तळेगाव दाभाडे, नारायणगाव आणि जुन्नर येथील दस्त नोंदणी कार्यालयांना कॉर्पोरेट लूक देण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यात मेट्रो, रिंगरोड, नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे नाशिक रेल्वे आणि ग्रीन कॅरिडोअर, पुणे-औरंगाबाद रस्ता, पुणे-बंगळुरू रस्ता असे अनेक प्रकल्प राज्य सरकारकडून हाती घेण्यात आले आहेत. विविध प्रकल्पांमुळे खरेदी-विक्री व्यवहारांची संख्या मोठी आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह “पीएमआरडीए’च्या हद्दीत देखील मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत आहेत. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयांत दस्त नोंदणीसाठी नागरिकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत. मागील आठवड्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीत ही बाब लक्षात घेऊनच पुण्यासह जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये अत्याधुनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला.

याविषयी माहिती देताना जिल्हा सह निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दीपक पाटील म्हणाले, जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांचे रूपडे बदलण्यात येणार आहे. या कार्यालयांचे इंटिरिअर डिझाइन अतिशय सुरेख करण्यात येणार असून, दस्तनोदणीच्या सर्व यंत्रणा सुसज्ज करण्यात येणार आहेत.

जुन्नरला तीन मजली इमारत

नारायणगाव येथील कार्यालय दोन हजार चौरस फूट एवढे मोठे असणार आहे, तर जुन्नर येथील कार्यालयाची इमारत किमान तीन मजली म्हणजेच साडेचार हजार चौरस फुटांची असणार आहे. या कार्यालयाच्या तळमजल्यावर दस्तनोंदणी कार्यालय, नागरिकांना बसण्यासाठी अद्ययावत व्यवस्था असेल.