पुणे महापालिकेच्या माजी आरोग्यप्रमुखास न्यायालयाचा दिलासा, अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे – कोरोना काळात महापालिकेच्या वारजे येथील रुग्णालयातील करोना चाचणी साहित्य, तसेच अन्य वैद्यकीय साहित्याची परस्पर खासगी रोगनिदान केंद्र चालकांना विक्री करुन 80 ते 90 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणात तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. जी चव्हाण यांनी भारती यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

वारजे भागात महापालिकेचे अरविंद बारटक्के रुग्णालय आहे. 2021 मध्ये कोरोना काळात बारटक्के रुग्णालयात करोना चाचणी साहित्य, औषधे, जंतूनाशक, तसेच अन्य वैद्यकीय साहित्य पुरविण्यात आले होते. बारटक्के रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अरूणा तायडे व डॉ. ऋषीकेश गार्डी यांनी नागरिकांच्या करोना चाचणीबाबतची बनावट नोंदी केली. नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली, असे भासविले. प्रत्यक्षात त्यांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या वैद्यकीय साहित्याची परस्पर खासगी रोगनिदान केंद्र चालकांना करुन 80 ते 90 लाखांची फसवणूक केली.

याप्रकारातील तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी दखल घेतली नसल्याच्या कारणावरून तिघांविरोधात तक्रार करत त्याच्या सखोल चौकशीची मागणी काळसुरे यांनी केली होती. याप्रकरणात, त्यांनी न्यायालयात खासगी फौजदारी तक्रार दिली होती. न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करुन सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानंतर, काळसुरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शासनाची फसवणूक, तसेच अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी भारती यांनी अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांमार्फत न्यायालयात अर्ज केला. भारती यांनी कोणताही भ्रष्टाचार केलेला नसून ते त्या विभागाचे प्रमुख असल्याने त्यांचे नाव फिर्यादी मध्ये घेण्यात आले आहे. डॉ. तारडे यांनी केलेल्या तक्रारीच्या वादातून न्यायालयाची दिशाभुल करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश घेतले गेले होते.

भारती हे सरकारी नोकर असताना त्यांचे विरुद्ध गून्हा दाखल करण्याचे आदेश हे सरकारची संमती असल्याशिवाय घेता येत नाही, असा युक्तिवाद बचावपक्षातर्फे अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी केला. त्यांना, अ‍ॅड. विष्णु होगे यांनी सहकार्य केले. न्यायालयाने बचावपक्षाचा युक्तिवाद मान्य करत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.