कोवॅक्‍सिन लसीला दबावाखाली मंजुरी? केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण

नवी दिल्ली – कोवॅक्‍सिन लसीच्या वापराला मंजुरी देण्यासाठी केंद्र सरकारवर कोणताही राजकीय दबाव नव्हता. या सर्व बातम्या अफवा परसरवणाऱ्या आहेत. कोवॅक्‍सिन लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देताना सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

कोवॅक्‍सिन लसीच्या मंजुरीसाठी बाह्य दबाव होता, अशा आशयाच्या काही बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. त्यावर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राजकीय दबावामुळे करोनावरील कोवॅक्‍सिन लसीला लवकर मंजुरी देण्यात आली आहे असा आरोप करण्यात येत होता. यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने एक निवेदन जारी करण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, आपत्कालीन परिस्थितीमध्ये करोनाच्या कोवॅक्‍सिन लसीला मंजुरी देताना सर्व मानकांचे आणि नियमांचे पालन करण्यात आले आहे. ही लस लवकरात लवकर बाजारात आणण्यासाठी कंपनीवर राजकीय दबाव असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या आहेत.

ही लस लवकर विकसित करण्यासाठी काही प्रक्रियांचे पालन करण्यात आले नाही, असेही काही माध्यमांमध्ये म्हटले आहे. या सर्व बातम्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.