Ranji Trophy : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाच्या मुलाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला क्रिकेटर….

 Vidhu Vinod Chopra Son Agni Chopra Created History In First-Class Cricket : प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा आणि चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांचा मुलगा अग्नि चोप्रा रणजी ट्रॉफीच्या पदार्पणाच्या हंगामात बॅटने खळबळ माजवत आहे. 25 वर्षीय फलंदाजाने मिझोरामकडून खेळताना पदार्पणाच्या मोसमात सलग पाच शतके झळकावून रणजी ट्रॉफीमध्ये विक्रम रचला आहे. अनुपमा चोप्राने अग्नीच्या विश्वविक्रमाबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून तिला ‘प्राउड मॉम’ असे कॅप्शन दिले आहे.

अग्नीने मेघालय विरुद्धच्या चौथ्या प्रथम श्रेणी सामन्यात 13 चौकार आणि 4 षटकारांसह केवळ 90 चेंडूत 105 धावा करत उल्लेखनीय कामगिरी केली. या शानदार कामगिरीने त्याने मिझोरामला पहिल्या डावात 359 धावांची मजबूत धावसंख्या उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अग्निने आतापर्यंत चार प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या काळात पाच शतके झळकावली आहेत. त्याने 95.87 च्या सरासरीने 767 धावा केल्या आहेत. अग्निनेही अर्धशतक झळकावले आहे.

चार सामन्यात पाच शतके…

प्रथम श्रेणी क्रिकेटच्या पहिल्या चार सामन्यांमध्ये शतक झळकावणारा अग्नि हा पहिला फलंदाज ठरला आहे. सिक्कीमविरुद्ध त्याने 166 आणि 92 धावांची खेळी खेळली होती. त्यानंतर नागालँडविरुद्ध 166 आणि 15 धावा केल्या. अरुणाचल प्रदेशविरुद्ध 114 आणि 10 धावा केल्या. आता मेघालयविरुद्ध त्याने पहिल्या डावात 105 धावा आणि दुसऱ्या डावात 101 धावा केल्या आहेत.

एक हजार धावांचा ओलांडू शकतो  टप्पा…

काही लोकांनी प्रतिक्रिया दिली आहे की, अग्निने प्लेट विभागातील कमकुवत संघांविरुद्ध या धावा केल्या आहेत, परंतु त्याच्या कामगिरीतील सातत्य आणि त्याच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अग्नीच्या कामगिरीने मिझोराम संघाला बळ मिळाले आहे. मोसमात तो 1000 धावांचा टप्पा ओलांडू शकतो, असे मानले जात आहे. त्याने आतापर्यंतच्या 8 डावात 767 धावा केल्या आहेत.

ICC Test Batting Rankings : केन विल्यम्सन अव्वलस्थानी कायम! पहिल्या 10 फलंदाजांमध्ये फक्त एकच भारतीय…

असा झाला क्रिकेटचा प्रवास

अग्नि चोप्राने आपल्या करिअरची सुरुवात मुंबईच्या ज्युनियर संघातून केली होती, पण नंतर तो मिझोरमला गेला. सय्यद मुश्ताकसाठी पदार्पण केल्यानंतर, त्याने एका महिन्यानंतर चंदीगडविरुद्ध विजय हजारे ट्रॉफीमध्ये लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. आता रणजी ट्रॉफीतील पदार्पणाच्या मोसमातील त्याच्या शतकी खेळींमुळे सर्वांचे लक्ष त्याच्याकडे लागले आहे.

अग्नि हा विधू विनोद चोप्रा यांचा मुलगा ..

उल्लेखनीय म्हणजे, अग्नि चोप्रा हा प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचा मुलगा आहे. अलीकडेच विधू विनोद चोप्रांनी 12वी फेल चित्रपट बनवला.  या चित्रपटाने चित्रपटसृष्टीत खळबळ उडवून दिली आहे. आता मुलाच्या कामगिरीने गौरवात भर पडली आहे.