टीव्ही पाहण्यावरून कारागृहात हाणामारी, वृद्ध कैदी जखमी

कोल्हापूर – जिल्हा मध्यवर्ती कळंबा कारागृहामध्ये किरकोळ कारणांवरून 2 कैद्यांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत वृद्ध कैदी जखमी झाला आहे. सुरेश कचरू वैती (वय- 70) असे जखमी कैद्याचे नाव आहे, तो जन्मठेपेची सध्या शिक्षा भोगत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारागृहात कैदी टीव्ही पहात बसले होते. आवडीनुसार चॅनेल बदलण्यावरून कैद्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. त्याचा राग मनात धरून खुनाच्या गुन्ह्यात संशयित कैदी दस्तगीर गफूर शहा याच्या सांगण्यावरून बैतुल अब्दुल शेख हा कैदी सर्कल नंबर ६ जवळ गेला. त्याने मातीत पडलेला काचेचा तुकडा घेऊन कैदी सुरेश वैती याच्यावर हल्ला केला.

यात हाताला काच लागल्याने वैती हा कैदी जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.