#CWC23 INDvPAK Live Score : रोहितचं शतक हुकलं, 86 धावावर बाद; टीम इंडिया विजयापासून 31 धावा दूर…

World Cup 2023 #INDvPAK Match Update : एकदिवसीय विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ 42.5 षटकांत 191 धावांवर गारद झाला. भारताला विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

रोहितचं शतक हुकलं….

रोहित शर्माच्या रूपाने भारताला तिसरा धक्का बसला. सलग दुस-या सामन्यात त्याला शतक पूर्ण करता आले नाही. रोहित 86(63) धावा करून बाद झाला. शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर इफ्तिखार अहमदने त्याचा झेल घेतला. रोहितने आपल्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले.

शेवटचं वृत्त हाती आले तेव्हा टीम इंडियाच्या 23.1 षटकात 3 बाद 161 धावा झाल्या आहेत. सध्या क्रीजवर श्रेयस अय्यर 38*(41) आणि केएल राहुल 3*(6) आहेत. भारतीय संंघ विजयापासून केवळ 31 धावा दूर आहे.

गिल आणि कोहली लवकर बाद…

विराट कोहलीच्या रूपाने भारताला दुसरा धक्का बसला. तो 16 धावा करून बाद झाला. 10व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हसन अलीने त्याला मोहम्मद नवाजकरवी झेलबाद केले. कोहलीने 18 चेंडूंचा सामना केला. या काळात त्याने तीन चौकार मारले. भारतीय संघाला 23 धावांवर पहिला धक्का बसला.  शाहीन आफ्रिदीने  पाकिस्तानला पहिले यश मिळवून दिले. तिसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने शुभमन गिलला बाद केले. गिल 11 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. त्याने चार चौकार मारले. गिलला शादाब खानने झेलबाद केले.

तत्पूर्वी, पाकिस्तानचा संघ 42.5 षटकांत 191 धावांवर गारद झाला. भारताला विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 50 धावा केल्या. गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या मोहम्मद रिझवानचे यावेळी अर्धशतक हुकले. तो 49 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. इमाम उल हकने 36, अब्दुल्ला शफीकने 20 आणि हसन अलीने 12 धावा केल्या. याशिवाय सहा फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. सौद शकील सहा, मोहम्मद नवाज चार, इफ्तिखार अहमद चार, शदाख खान दोन आणि हारिस रौफ दोन धावा करून बाद झाला.