#CWC23 INDvPAK Live Score : भारताला पहिला धक्का, शाहीन आफ्रिदीने केले शुभमन गिलला बाद…

World Cup 2023 #INDvPAK Match Update : एकदिवसीय विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ 42.5 षटकांत 191 धावांवर गारद झाला. भारताला विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

विजयासाठी 192 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला 23 धावांवर पहिला धक्का बसला.  शाहीन आफ्रिदीने  पाकिस्तानला पहिले यश मिळवून दिले. तिसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने शुभमन गिलला बाद केले. गिल 11 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. त्याने चार चौकार मारले. गिलला शादाब खानने झेलबाद केले.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, सध्या भारताच्या 5 षटकात एका विकेटवर 38 धावा झाल्या आहेत. रोहित शर्मासोबत विराट कोहली क्रिजवर आहे. रोहित शर्माच्या 15*(15) तर विराट कोहलीच्या 5*(4) धावा झाल्या आहेत.

पाकिस्तानचा संघ 42.5 षटकांत 191 धावांवर गारद झाला. भारताला विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 50 धावा केल्या. गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या मोहम्मद रिझवानचे यावेळी अर्धशतक हुकले. तो 49 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. इमाम उल हकने 36, अब्दुल्ला शफीकने 20 आणि हसन अलीने 12 धावा केल्या. याशिवाय सहा फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. सौद शकील सहा, मोहम्मद नवाज चार, इफ्तिखार अहमद चार, शदाख खान दोन आणि हारिस रौफ दोन धावा करून बाद झाला.

टीम इंडियाच्या पाच गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. गोलंदाजांमध्ये शार्दुल ठाकूर हा एकमेव असा होता ज्याला एकही यश मिळाले नाही. वेगवान गोलंदाज बुमराहनं 7 षटकात 19 धावा तर सिराजनं 8 षटकांत 50 धावा दिल्या. शार्दुलनं अवघे दोन षटक टाकले अन् 12 धावा दिल्या. अष्टपैलू हार्दिकनं 6 षटकात 34 धावा दिल्या. फिरकीपटू कुलदीप यादवनं 10 षटक पूर्ण करताना 35 तर जडेजानं 9.5 षटकात 38 धावा दिल्या.

दरम्यान, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने 1992, 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 मध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारतीय संघाला ही विजयी मालिका सुरू ठेवायची आहे. टीम इंडिया तिसर्‍यांदा विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. भारताने 1996 (बंगलोर) आणि 2011 (मोहाली) मध्ये विजय मिळवला होता.