सायबर क्राइमने फास आवळला; गेल्या वर्षीच्या तुलनेत तक्रारींचे प्रमाण वाढले

संजय कडू

पुणे – सायबर क्राइमच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होण्याबरोबरच चोरांची कार्यपद्धतीही बदलत आहे. पुणे शहरात 2022 मध्ये 19 हजार 500 सायबर क्राइमच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तर सध्या दि. 18 ऑगस्ट 2023 पर्यंत तब्बल 22 हजार 671 तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत.

ऑनलाइन फसवणूक साधारणपणे एटीएम कार्ड हॅक करणे, ऑनलाइन व्यवसाय फसवणूक उदा. बियाणे किंवा तेल व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक किंवा मल्टिलेव्हल मार्केटिंग, बदनामी आणि गैरवापर यासारखे समाज माध्यमांद्वारे होणारे गुन्हे, हॅकिंग, डेटा चोरी अशा प्रकारे केली जाते. हे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सप्टेंबर 2022 मध्ये पुणे पोलिसांनी पोलीस स्टेशन स्तरावर सायबर सेलची स्थापना केली. तर, सायबर पोलीस स्टेशनवरील प्रकरणांचा भार कमी करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना ठराविक रकमेच्या सायबर गुन्ह्यांचा तपास करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

शहरातील परिसराचा विचार करता नगर रोड परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये 5,890 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे, तर सोलापूर महामार्गावरील पोलीस ठाण्यांमध्ये 5,697 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे.शहरातील मध्यवर्ती भाग डेक्कन आणि शिवाजीनगरचा समावेश असलेल्या परिमंडळ एकमध्ये सर्वांत कमी म्हणजे 1336 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

सायबर प्रकरणांमध्ये पीडितांच्या आर्थिक लोभामुळेच फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. नाममात्र गुंतवणुकीवर मोठा लाभ देण्याचे आश्‍वासन हे भामटे देतात. यानंतर वेगवेगळ्या “फ्रॉड’ योजना सादर करतात. सुशिक्षित नागरिकदेखील विचार न करता त्यांच्या पैसे गुंतवतात. व्यवहारापूर्वी तज्ज्ञ, पोलीस किंवा कुटुंबाशी सल्लामसलत करत नाहीत. लोकांना शक्‍य तितक्‍या लवकर श्रीमंत व्हायचे आहे आणि ते फसवणूक करणाऱ्यांना पैसे हस्तांतरित करण्यास घाई करतात. ते फॉरेक्‍स ट्रेडिंग, शेअर ट्रेडिंग, क्रिप्टोकरन्सी ट्रेड, ऑनलाइन रिव्ह्यू आणि टास्क फ्रॉड, इन्शुरन्स पॉलिसी आणि इतरांमध्ये गुंतवणूक करुन फसले जातात.

आयटी सेक्‍टर भामट्यांचे टार्गेट
एकट्या सायबर पोलीस ठाण्यात मागील आठ महिन्यांत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी 372 एफआयआर नोंदवले आहेत. 492 प्रकरणे वेगवेगळ्या साइट्‌सवर बदनामी, तर गैरवर्तनाची 366 प्रकरणे आहेत. यात टास्क फ्रॉडच्या सर्वाधिक 182 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सुशिक्षित लोक, विशेषत: संगणक अभियंता हे फसवणूक करणाऱ्यांच्या संदेशांना प्रतिसाद देत आहेत.

त्यांची फसवणूक होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, असे सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल पाटील यांनी दिली. या कर्मचाऱ्यांना ले-ऑफ किंवा पगार कमी होण्याची भीती वाटते. यामुळे ते ऑनलाइन पद्धतीने पर्यायी उत्पन्न शोधत राहतात. येथेच ते अलगद सायबर भामट्यांच्या जाळ्यात सापडतात.

तज्ज्ञांचे निरीक्षण…
“सायबर भामट्यांकडून नुकसान झालेले लोक त्यांच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदवत आहेत. तथापि, असे बरेच लोक आहेत, की ज्यांचे पाच हजार ते दहा हजार रुपये किंवा इतर किरकोळ रक्कम गमावली आहे. ते पोलिसांकडे तक्रार करत नाहीत. लॉकडाऊननंतर लोक ऑनलाइन गोष्टींवर अधिक अवलंबून असल्याचे आढळून आले आहे. ही बाब सायबर चोरट्यांच्या पथ्थ्यावर पडली आहे,’ असे सायबर क्राइम तज्ज्ञ वकील ऍड. गौरव जाचक यांनी दैनिक “प्रभात’ला सांगितले.

लोक मोबाइलवर विविध ऍप डाउनलोड करतात. त्यावेळी फोन डेटामध्ये प्रवेश करण्याची परवानगी देतात. काही वेळा रिमोट ऍक्‍सेस सॉफ्टवेअरद्वारे त्यांचा सर्व डाटा सायबर चोराच्या हातात गेलेला असतो. फसवणूक करणारे हे रिमोट ऍक्‍सेस सॉफ्टवेअर्स वापरतात आणि बॅंक खाते किंवा यूपीआय ऍपमधून पैसे काढून घेतात. ऍप डाउनलोड करताना सतर्कता आवश्‍यक आहे. – ऍड. गौरव जाचक, सायबर क्राइम तज्ज्ञ

तक्रारींचे स्वरुप बदलले

  • सर्वाधिक गुन्हे – ऑनलाइन बदनामी, बॅंक आणि एटीएमसंदर्भातील फसवणूक, टास्क फ्रॉड
  • घटलेले गुन्हे – एमएसईबी फ्रॉड, सेक्‍सटॉर्शन, लोन ऍपच्या तक्रारी