बंगालच्या उपसागरात घोंगावतेय चक्रीवादळ; नागरिकांना दिला सर्तकतेचा इशारा

भुवनेश्‍वर – संपूर्ण देशभरात पावसाने थैमान घातलेले असतानाच बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ घोंगावत आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर ओडिशामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हे चक्रीवादळ दोन दिवसांत धडक्‍याची शक्‍यता असून सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. हे पश्‍चिम मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर तयार होत आहे. हे वादळ समुद्रसपाटीपासून 5.8 ते 7.6 किमी उंचीवर असून, यामुळे 24 तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, ओडिशामधील मलकानगिरी, कोरापुट, नबरंगापूर, रायगडा, गजपती आणि गंजम येथे हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. तसेच बुधवारी गजपती, गंजम, पुरी, मलकानगिरी, कोरापुट आणि रायगडा जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार ते अति अतिवृष्टी होऊ शकते.

याशिवाय नबरंगपूर, कालाहंडी, कंधमाल, बालनगीर, नयागड, खुर्दा, कटक, जगतसिंगपूर आणि मयूरभंज जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, महिनाभरापूर्वी अरबी समुद्रात दाखळ झालेल्या बिपरजॉय वादळामुळे गुजरात आणि राजस्थान राज्यामध्ये प्रचंद नुकसान झाले होते. त्यानंतर संपूर्ण देशात मान्सून सक्रीय झाला. आता संपूर्ण देशात धो-धो पाऊस बरसत असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे दरड तर कुठे इमारत कोसळून नागरिक ठार होत असल्याच्या घटना घडत आहेत.

एवढे असतानाही आता बंगालच्या उपसागरात पुन्हा नवं चक्रीवादळ घोंगावत असून, यामुळे देशातील 12 राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.