Cyclone Michaung : मिचॉन्ग चक्रीवादळ ५ डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकणार ; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आदेश

Cyclone Michaung: भारतीय हवामान विभागाने (IMD) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागानुसार, मिचॉन्ग चक्रीवादळ 5 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकेल, त्यामुळे किनारपट्टी भागात जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा विभागाकडून देण्यात आला आहे.

मिचॉन्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, नॅशनल क्रायसिस मॅनेजमेंट कमिटी (NCMC) ने  राज्य सरकारे आणि केंद्रीय मंत्रालये आणि त्यांच्याशी संबंधित विभाग यांच्या तयारीचा आढावा घेतला. निवेदनानुसार, मच्छिमारांना समुद्रात न जाण्यास सांगण्यात आले आहे, तर पुरेशा प्रमाणात आश्रयस्थान, वीजपुरवठा, औषधे आणि आपत्कालीन सेवा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

एनडीआरएफची तयारी 
NDRF ने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पुद्दुचेरीसाठी 18 बचाव पथके तयार केली आहेत आणि 10 अतिरिक्त टीम तयार ठेवल्या आहेत. तटरक्षक दल, लष्कर आणि नौदलाच्या मदत आणि बचाव पथकांना जहाजे आणि विमानांसह सज्ज ठेवण्यात आले आहे. केंद्रीय एजन्सी आणि तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पुद्दुचेरी सरकारच्या तयारीचा आढावा घेत आहेत.

दरम्यान, कॅबिनेट सचिव म्हणाले की, “राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी सर्व आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत.” त्यासोबतच   सचिवांनी तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पुद्दुचेरी सरकारांना आश्वासन दिले की सर्व केंद्रीय एजन्सी तयार आहेत आणि त्यांना मदत करण्यासाठी उपलब्ध असतील.