पुणे | डी.एल.एड. प्रवेशसाठी आजपासून सुरू

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने (विद्या प्राधिकरण) प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सोमवारपासून (दि. ३) ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता डी.एल.एड. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. शासकीय व व्यवस्थापन कोट्याच्या प्रवेशासाठी स्वतंत्र वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, एसईआरटीच्या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रकासह प्रवेशाची नियमावली उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार डी.एल.एड. अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा, असे आवाहन राज्यस्तरीय प्रवेश निवड, निर्णय व प्रवेश संनियंत्रण समितीचे अध्यक्ष राहुल रेखाराव यांनी केले आहे. सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १५ जुलैपासून प्रथम वर्षाचे वर्ग सुरू होणार आहेत.

विद्यार्थ्यांना ३ जून ते १८ जून या कालावधीत प्रवेशासाठी अर्ज भरता येणार आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण (डायट) स्तरावर पूर्ण भरलेल्या अर्जाची ऑनलाइन पडताळणी ३ ते १९ जून या कालावधीत केली जाणार असून, २६ जून रोजी प्रथम प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.

प्रवेशाबाबतची सर्व माहिती https://www.maa.ac.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रथम फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना २७ जून ते १ जुलै या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणार आहे. या फेरीत प्रवेश घेतल्या विद्यार्थ्यांची यादी १ जुलैला जाहीर होईल.

प्रवेश वेळापत्रक
दुसरी फेरी २ जुलै रोजी होईल. त्या वेळी महाविद्यालयांचे विकल्प भरता येतील, तसेच पूर्वीचे विकल्प बदलता येतील. ४ जुलै रोजी दुसऱ्या प्रवेश फेरीची यादी प्रसिद्ध होईल. या फेरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना येत्या ४ ते ८ जुलै दरम्यान प्रवेश घेता येईल.

प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी ८ जुलैला जाहीर होणार असून, तिसऱ्या फेरीला विकल्प देण्यासाठी ९ जुलै रोजीची मुदत असेल. तिसऱ्या व अंतिम फेरीची यादी ११ जुलै रोजी जाहीर होणार असून त्या विद्यार्थ्यांची यादी १५ जुलैला जाहीर होईल. डायटच्या प्राचार्यांनी महाविद्यालयनिहाय प्रवेशाची खात्री करून घेण्यासाठी १६ ते १९ जुलै अशी मुदत दिली आहे.