कराड तालुक्‍यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत

रेठरे बुद्रुक  – लॉकडाऊन मधील संचारबंदीमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा मोठा फटका दुधउत्पादक शेतकऱ्याला बसला आहे. तालुक्‍यातील दूध संकलन केंद्राची अनियमितता, दूध बिलांचा विलंब यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. यात कटेनमेंट झोनमधील गावे तसेच करोनाबाधित रूग्ण मिळून आलेल्या गावांचा जास्तीचा सहभाग आहे.

कराड तालुका शेती सदन तालुका आहे. येथे शेतीसह दुध उत्पादन मोठ्याप्रमाणावर आहे. सातारा तसेच लगतच्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून दुधसंघ दुधासाठी कराड तालुक्‍यात येत आहेत. परंतू, कराड तालुक्‍यात वाढत्या करोना प्रार्दुभावामुळे दुध उत्पादन व संकलनावर मोठा परिणाम झाला आहे.
कराडशहर, मलकापूर, वनवासमाची, आगाशिवनगर, कापील व रेठरे बुद्रुक, आदी कराड तालुक्‍यातील गावात करोना बाधित रुग्ण सापडले आहेत आणि त्याचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे तालुक्‍यातील विविध गावात कडक संचारबंदी व लॉकडाऊन करण्यात आले आहे. गावे पूर्णपणे सील करण्यात आली आहेत. तसेच परिसरातील गावांमध्येही कडक संचारबंदी लागू असल्यामुळे सर्व व्यवसाय बंद आहेत.

कृष्णा-कोयनेचा काठ हा बागायती पट्टा आहे. येथील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतीवर आधारित असणारा दुग्ध व्यवसायही येथे मोठ्या प्रमाणावर केला जातो. पिढ्यानपिढ्या काही शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय आहे. हल्ली बहुतांशी तरुण सुशिक्षित युवकही या व्यवसायाकडे वळले आहेत. या तरुण शेतकऱ्यांनी कर्जे काढून लाखो रुपयांची जनावरे खरेदी करून गोठे सुरू केले आहेत. या दुग्ध व्यवसायात ते आपले बस्तान बसवून चांगले सुराला लागले होते. परंतु, चालू वर्षी एकापाठोपाठ एक संकट येत आहेत. अतिवृष्टीचे संकट गेले तोच करोनाचे संकट उभे ठाकले आहे.
करोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेले दोन महिन्यांपासून या दूध व्यवसायात नियमितता राहिलेली नाही.

दोन दिवस दूध संकलन केंद्र सूर होतात. तर काही दिवस पुन्हा बंद. आता तर रेठरे बुद्रुक मध्येच करोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे गाव व परिसरात एकदम कडकडीत बंद आहे.छोटे कमी दूध उत्पादन करणारे शेतकरी डेअरी बंद असलीतर दूध घरी खाऊ शकतात. वैयक्तिक एक दोन जनावरे असणारे शेतकरी डेअरी बंद असलीतरी घरी दही बासुंदी करून दूध खातील. परंतु, ज्यांनी दुग्ध व्यवसायासाठी मोठे गुरांचे गोठे निर्माण केले आहेत. अशा गोठ्यातील व्यावसायिकांचे दररोज 20-25 लिटर ते 50 लिटर पर्यंतचे दूध डेअरी बंद असल्यास काय करायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

डेअरी बंद असलीतरी गुरांचे दूध काढावेच लागते. जनावरांचे दूध काढण्याकडे दुर्लक्ष केल्यास गुरांना स्तनाचा विकार होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे डेअरी सुरू असो अथवा नसो गुरांचे नित्यनियमाने दूध काढावेच लागते तसेच गुरांचे खाद्य ही महागले आहे. दरम्यान, गत चार पाच दिवसांपासून परिसरातील दूध संकलन बंद आहेत. दूध फिरून विक्री करणेही शक्‍य नाही. त्यामुळे ज्यादाचे दूध काय करायचे? असा प्रश्‍न शेतकऱ्यासमोर आवाचून उभा आहे.

आपत्तीच्या काळात दरांमध्ये तफावत
सातारा जिल्ह्यात म्हैस दुधाला खरेदी दर फॅट नुसार 36 रुपये मिळतो. तसेच गायच्या दुधास 25 रुपये दर दूध उत्पादकाला मिळतो. इतर जिल्ह्यात हा दर म्हैस दूध 39 रुपये तर गाय दूध 27 रुपये असा आहे. जिल्हा निहाय दर तफावत का? दूध उत्पादकांकडून 36 रुपये प्रमाणे दूध खरेदी होते. तेच दूध ग्राहकांना 58 ते 60 रुपये लिटरने विक्री होते तर शेतकऱ्यांवर अन्याय का? याचे उत्तर देण्यास ना डेरी चालक तयार आहेत ना सरकार. त्यामुळे कोणतही आपत्ती येओ भरडला जातो तो शेतकरीच. दरम्यान, करोना महामारी सुरू होण्यापूर्वी दूध खरेदीचा दर सर्व जिल्ह्यात एक सारखाच होता. मात्र ऐन महामारीच्या काळात जिल्हानिहाय दर वेगवेगळे आकारले जात आहेत.

Leave a Comment