इंदापुरातील दांडिया कार्यक्रम; राजकीय दांड्या उडण्याचे संकेत

नीलकंठ मोहिते

इंदापूर – इंदापूर शहरात नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया कार्यक्रम प्रत्येक प्रभागात रंगू लागले आहेत. यामध्ये हजारो महिलांची होणारी गर्दी, नवीन राजकारणात प्रवेश करणाऱ्या युवकांचा जोश. आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरतशेठ शहा, व इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, प्रत्येक प्रभागातील दांडिया कार्यक्रमास उपस्थिती दर्शवतात. मीच नगरसेवक होणार असा बोलबाला करणाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे इंदापूरकर यंदा नगरपरिषदेच्या निवडणुकीत कोणाच्या राजकीय दांड्या उडवणार याकडे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, शहा परिवाराचे मुकुंद शहा, भरत शहा, अंकिता शहा, यांच्या माध्यमातून अधिकचे कार्यक्रम होताना दिसत आहेत. तर शहर संघर्ष समितीच्या माध्यमातून प्राध्यापक कृष्णा ताटे आपली टीम घेऊन प्रत्येक शहरातील लहान मोठे प्रश्‍न शासनाकडून प्रशासनाकडून सोडवण्यासाठी सामाजिक जाणवेतून काम करत आहेत; परंतु भारतीय जनता पार्टी, पाहिजे त्या प्रमाणात इंदापूर शहरात मोठे उपक्रम हाती घेताना दिसत नाही. विविध कार्यक्रमात दिसणारा लोकसंग्रह, नव्या युवकांची वाढणारी क्रेझ, हे सर्व पाहता येणाऱ्या आगामी नगरपालिकेचे नगरसेवकांचे चित्र नव्याच युवा वर्गाच्या हाती इंदापूरकर सोपवतील असे दिसते आहे.

होऊ द्या खर्च

इंदापूर नगर परिषदेची निवडणूक राज्यातील इतर नगर परिषदेच्या निवडणुका लाभल्या असल्याने निवडणुकी वाचून नगरपरिषद लटकलेले आहे. लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीपेक्षाही इंदापूर नगर परिषदेची निवडणूक लवकर व्हावी, अशी अपेक्षा इंदापूरकरांची दिसते. निवडणूक कोणत्याही क्षणाला लागू शकते. राज्य सरकार तसेच निवडणूक आयोग कधी काय निर्णय घेईल याचा थांग पत्ता नसल्याने, खऱ्या अर्थाने होऊ द्या खर्च, ही भूमिका इंदापूर शहरात सध्या राजकीय नेतेमंडळींनी नव्या पुढाऱ्यांनी चालू केले आहे.

लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी

प्रत्येक प्रभागात नामांकित अभिनेत्री तसेच राजकीय मल्ल आणत, आपल्या प्रभागात आमची ताकद बघा, असा संदेशच दांडिया कार्यक्रमातून स्पष्ट दिसत आहे. राजकीय लोकांचे काहीही असो; मात्र शहरातील महिला भगिनींना महिलांसाठी असणारे प्रोग्रॅम अनोखी पर्वणी ठरलेले आहेत. प्रत्येक प्रभागात प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका, प्रत्येक नगरसेवक करतो असे नाही; परंतु इंदापुरातील नगरसेवक व भावी होणारे नगरसेवक लोकसंग्रह निर्माण करण्यासाठी एकही संधी सोडताना दिसत नाहीत.