आई-वडिलांंची काळजी घेण्यासाठी स्वीकारली पूर्णवेळ मुलीची नोकरी; दरमहा घेते ‘इतका’ पगार

बीजिंग – वयोवृद्ध पालकांची काळजी घेण्याचे काम मुलगा किंवा मुलगी यांनी करावे हे सांस्कृतिक तत्व जगाच्या पाठीवरील सर्वच देशांमध्ये लागू होते. विविध कारणांनी जरी मुले आपल्या पालकांची प्रत्यक्ष काळजी घेत नसले तरी आर्थिक बाबतीत मात्र ते मदत करत असतात. आता चीनमध्ये एक आगळीवेगळी बाब समोर आली आहे.

एका चाळीस वर्षे महिलेने आपली नोकरी सोडून आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी त्यांची मुलगी म्हणून नोकरी स्वीकारली आहे. आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी तिला दरमहा 4000 युवान म्हणजेच सुमारे साडेसातशे डॉलर्स वेतन मिळते.  नीयानान असे या 40 वर्षे महिलेचे नाव असून पंधरा वर्षे ती एका वृत्तसंस्थेमध्ये काम करत होती पण तेथील कामाचा ताण आणि तणाव तिला सहन होत नव्हता. तेव्हा तिच्या आई-वडिलांनी तिला ही नोकरी सोडून आमच्या घरात राहायला ये आणि आमची काळजी घे, अशी ऑफर दिली.

नियानानला ही ऑफर मान्य झाली आणि तिने आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन आई-वडिलांसोबत राहण्यास सुरुवात केली. ‘फुल टाईम डॉटर’ असे तिच्या पदाचे नाव ठरवण्यात आले असून आई-वडिलांची 24 तास काळजी घेण्याचे काम तिने स्वीकारले आहे. तिच्या या आगळ्यावेगळ्या नोकरीला एक वर्ष पूर्ण झाले असून मी माझ्या या नव्या नोकरीमध्ये खूप समाधानी आहे. कारण त्याला प्रेमाची झालर आहे असे तिने म्हटले आहे.

आपल्या या आगळ्यावेगळ्या नोकरीमध्ये ती आई-वडिलांची सर्व कामे करते त्यांना घरगुती सामान आणून देणे, त्यांच्यासोबत शॉपिंगला जाणे तसेच दररोज स्वयंपाक करून त्यांना जेवायला वाढणे. एवढेच नव्हे तर त्यांच्यासोबत गाणे म्हणणे किंवा नृत्य करणे अशी सर्व प्रकारची कामे ती करते. तर महिन्यातून दोन वेळा आई-वडिलांना कुठेतरी पर्यटनाला घेऊन जाणे ही सुद्धा तिच्या कामाची जबाबदारी आहे ती जबाबदारी सुद्धा ती पार पाडते. ती आपल्या या कामावर खुश असली तरी तिच्या आई-वडिलांनी तिला इतर कुठे अधिक चांगली नोकरी मिळाली तर कधीही जाण्याची परवानगी दिली आहे जोपर्यंत तुला या घरात राहणे आवडत आहे तोपर्यंत तू हे काम कर असे त्यांनी सांगितले आहे.

निया नान च्या आई-वडिलांना दर महिन्याला मिळणाऱ्या 15000 डॉलर्सच्या पेन्शन मधूनच तिचे वेतन दिले जाते. या आगळ्यावेगळ्या नोकरीची बातमी प्रसिद्ध होताच, सोशल मीडियावर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. ‘ही नोकरी नसून ती आपल्या आई-वडिलांच्या जीवावर मजा करत आहे’ अशा काही प्रतिक्रिया ही उमटल्या. तर काही लोकांनी ‘यानिमित्ताने का होईना वृद्ध आई-वडिलांची ती काळजी घेत आहे हे सुद्धा चांगले आहे,’ असे म्हटले आहे