पुणे | नीट पीजी अर्जासाठी ६ मेपर्यंत मुदत

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वैद्यकीय क्षेत्रातील एम.डी., एम.एस., डी.एन.बी. यांसारख्या पदव्युत्तर शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट पीजी या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी ६ मे ही अंतिम मुदत आहे. येत्या २३ जून रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. १८ जूनपासून परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

एमबीबीएस पदवीधारकांसाठी विविध विषयातील शिक्षण घेण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. परीक्षेबाबतचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. केंद्रीय स्तरावर पदव्युत्तर शिक्षणासाठी नीट पीजी ही एकमेव परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारे राबवण्यात येते.

त्यामुळे कोणताही गैरप्रकार घडत नाही. नीट पीजी ८०० गुणांची परीक्षा संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात येते. ही परीक्षा २३ जून रोजी सकाळी ९ ते १२:३० या वेळेत घेतली जाईल. अर्जातील त्रुटी दुर करण्यासाठी २६ मे ते ३ जून हा मोठा कालावधी विद्यार्थ्यांसाठी देण्यात आला आहे. या कालावधीत मूळ अर्जात बदल करता येणार आहेत. १५ जुलैपर्यंत परीक्षेचा निकाल लागणार आहे.

नीट-पीजीची परीक्षा देशभरातील २५९ केंद्रांवर एकाच दिवशी एका वेळेत घेण्यात येईल. एमबीबीएसनंतर आंतरवासीयता अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेता येईल. देशपातळीवरील, तसेच राज्यपातळीवरील सर्व पदव्युत्तर जागांवरील प्रवेश हे या प्रवेश परीक्षेच्या गुणांच्या आधारावर दिले जातात.