आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी, ३० लाखांच्या खंडणीची मागणी

पुणे – राजकरणात सध्या अनेक खळबळजनक घटना घडत आहे. यातच आता पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.  लांडगे यांच्या मोबाईल फोनवर ३० लाखांच्या खंडणीचा मॅसेज आला आहे. याप्रकरणाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

आमदार महेश लांडगे यांना ‘परिवर्तन’ हेल्पलाईनच्या मोबाईल क्रमांकावर ‘30 लाखाची खंडणी दे, अन्यथा जीवाला धोका आहे’, अशा आशयाचा मेसेज पाठवण्यात आला आहे. या मॅसेजमध्ये बँक डिटेल देण्यात आले असून बाकीची रक्कम एका ठिकाणी गाडीत ठेवण्यास सांगितले आहे. या मॅसेजची गंभीर दखल घेत भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.

 ‘परिवर्तन’ हेल्पलाईन

महेश लांडगे हे परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांची मदत करतात. नागरिक या हेल्पलाईन नंबरवर आपली तक्रार करून मदत मागतात. त्यानंतर महेश लांडगे यांची टीम तक्रारदार नागरिकाची तातडीने मदत करतात. मात्र आता याच हेल्पलाईन नंबरवर व्हाट्सअ ॅपद्वारे खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हा मेसेज पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, नेते मंडळींना जीवे मारण्याची धमकी येण्याचे हे पहिलेच प्रकरण नाही. याआधी देखील अनेक नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना देखील मॅसेजद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तर पुण्यातील कॉँग्रेसचे माजी नगरसेवक यांना देखील मोबाईलवर खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.