भुईमूग, बाजरी, ज्वारी लागवड क्षेत्रात घट

– रामचंद्र सोनवणे

राजगुरूनगर – खेड तालुक्‍यात खरीप हंगामातील सोयाबीन आणि मका (गोल्डन)या नगदी पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून भुईमूग, ज्वारी, बाजरी लावगड क्षेत्रात घट झाली आहे. यावर्षी पावसाने ओढ दिल्याने पेरण्या उशिरा झाल्या आहेत. तालुक्‍यात सरासरी 50 टक्‍के पेरणी झाली आहेत. यात भात, सोयाबीन आणि भूईमुगाच्या पेरण्या पूर्णत्वाकडे आहेत. बटाटा पिकाला वाफसा न मिळाल्याने लागवड रखडली, असल्याचे तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे, मंडलकृषी अधिकारी नरेंद्र वेताळ यांनी दिली.

खेड तालुक्‍यात कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार 50 हजार 900 हेक्‍टर क्षेत्रात खरीप हंगामातील विविध पिके घेतली जातात. यात भात, सोयाबीन, मका, भुईमूग, ऊस, बटाटा बाजरी, ज्वारी यांच्यासह भाजीपाल्याची पिके घेतली जात आहेत. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात भात हे प्रमुख पीक घेतले जात आहेत तर तालुक्‍याच्या मध्य पूर्व सोयाबीन, मका या खरीप हंगामातील नगदी पिकाकडे शेतकऱ्यांचा कल आहे. तालुक्‍यात भात पिकाखालील क्षेत्रात जास्त वाढ झाली नाही मात्र, सोयाबीन व मका या खरीप हंगामातील पिकाच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.

तालुका कृषी विभागाकडून विविध योजना व शेती पिकांची माहिती शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्याकडून देण्यात आली आहे. गावोगावी जनागृती केली जात आहे. बी बियाणे- खते, औषधे याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. शेतकऱ्यांसाठी पिक विमा काढण्यासाठी 24 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यात अग्रीकल्चर इन्शूरन्स कंपनीची नियुक्ती केली आहे. जवळच्या सुविधा केंद्रात शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याचे कृषी विभागाने आवाहन केले आहे.

35 शेतकऱ्यांना ट्रॅक्‍टर तर 162 जणांना अवजारे खरेदीसाठी अनुदान
खेड कृषी विभागाच्या माध्यामतून उन्नत शेती समृद्ध शेतकरी कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत तालुक्‍यातील 894 शेतकऱ्यांनी ट्रॅक्‍टर अनुदान मिळण्यासाठी मागणी अर्ज सादर केले आहेत. मळणीयंत्र, पेरणीयंत्र, रोटावेटर, कल्टीवेटर आदि अवजारांसाठी तालुक्‍यातील 796 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अर्ज दाखल केले आहेत. शेतकऱ्यांनी जास्त प्रतिसाद दिल्याने अखेर या योजनेचा लाभ देण्यासाठी सोडत घेण्यात आली. खेड पंचायत समितीच्या सभापती सुभद्रा शिंदे, उपसभापती भगवान पोखरकर, पंचायत समितीच्या सदस्या ज्योती अरगडे, कृषी निरीक्षक अरुण पंडित, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे, मंडलअधिकारी नरेंद्र वेताळ, प्रवीण जाधव, विजय पडवळ, रामचंद्र बारवे आदीच्या उपस्थित ही सोडत काढण्यात आली आहे. मागील वर्षी तालुक्‍यात 35 शेतकऱ्यांना ट्रॅक्‍टर खरेदी अनुदान 40 लाख 50 हजार रुपये देण्यात आले होते. तर 162 शेतकऱ्यांना अवजारे खरेदी अनुदानापोटी 65 लाख 46 हजार रुपये कृषी विभागाकडून देण्यात आले आहेत.

पिकांबाबत संभ्रम
दरवर्षी पावसासाची अनियमितता आणि पारंपारिक पिकांमधील उत्पादकता याचा शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. तालुक्‍यातील शेतकरी पावसाच्या बदलत्या चक्रामुळे हैराण झाला आहे. शेतात कोणती पिके घ्यायची याबाबत संभ्रमात सापडला आहे. पावसाचे चक्र बदलल्याने शेतकरी नगदी पिकांकडे वळला आहे. खरीप हंगामातील भात, भूईमुग बटाटा पिकांपेक्षा कमी पावसात व नुकसान न होणाऱ्या सोयाबीन, मका या नगदी पिके घेण्याकडे त्यांचा कल वाढला आहे.

वातावरणातील बदलानुसार शेतकरी नगदी पिके घेत आहेत. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, मोफत सल्ला दिला जात आहे. याबरोबर पीक प्रात्यक्षिक व प्रशिक्षण यावर भर देण्यात आला आहे. मका कीड नियंत्रण पेरणीपूर्व प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविण्यात आले आहे. कीड व रोग सर्वेक्षण कार्यक्रमात मका व ऊस या दोन पिकांचा यात समावेश करण्यात आला आहे. तालुक्‍यात सध्या सोयाबीन व मका पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. शेतकऱ्यांना शेती संदर्भात माहिती हवी असल्याने त्यांनी कृषी गावातील कृषी सहाय्यकांशी संपर्क करावा.
– नरेंद्र वेताळ, मंडल कृषी अधिकारी

Leave a Comment