आयएनएस विशाखापट्टणम युध्दनौकेचे राष्ट्रार्पण

मुंबई- आयएनएस विशाखापट्टणम या 15 ई प्रकारतील युध्दनौकेचे रविवारी राष्ट्रार्पण करण्यात आले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थीत होते. ही युद्धनौका सेवेत दाखल झाल्याने नौदलाची ताकद वाढणार आहे तिरंगा आणि नौदलाचा झेंडा फडकवण्याचा शानदार कार्यक्रम यावेळी झाला.

या युध्दनौकेचे वजन सुमारे 7400 टन आहे. आणखी 3 युद्धनौकांची बांधणी मुंबईतील माझगाव डॉकमध्ये युद्धपातळीवर सुरू आहे. आयएनएस विशाखापट्टनम नौदलात दाखल झाल्यावर याच आठवड्यात आयएनएस वेला’ ही कलवरी वर्गातील चौथी पाणबुडी नौदलाच्या सेवेत दाखल होत आहे.

चीनवर नाव न घेता टीका
1992 आंतरराष्ट्रीय सागरी सीमेबाबत, विशेष आर्थिक क्षेत्र याबद्दलचे नियम निश्चित करण्यात आले होते. मात्र काही बेजबाबदार देश स्वतःच्या हिताकरता अरुंद मार्गांबाबत एकाधिकार वापरत आहेत, सागरी सीमा पाळत नाहीत, सागरी सीमेबाबत मनमानी व्याख्या करत आहेत, अशी टीका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनचे नाव न घेता केली.

विशाखापट्टनमच्या राष्ट्रापर्णामुळे कार्यक्रमाच्या निमित्ताने देशाची सागरी शक्ती वाढत आहे असे मत व्यक्त करून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, भारत एक जवाबदार देश आहे, युद्धनौकांची बांधणी करणाऱ्या नौदलाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. जगभरात सीमा वाद आहेत, जगभरातील देश लष्करी ताकद वाढवत आहेत.

2023 मध्ये जगभरात संरक्षण दलावरील खर्च हा 2.1 ट्रेलियन डॉलर्स पर्यंत जाणार आहे. एवढा तर काही देशांचे वर्षभराचे बजेटही नसेल. संरक्षण दलावरील खर्चात पुढील काही वर्षात आणखी वाढ होणार आहे.

नौदलाचे 90 टक्के स्वदेशीकरण झाले आहे. 39 युद्धनौकांची बांधणी देशात वेगाने सुरू आहे. विक्रांतवरही काम जोरात सुरू आहे. करोना काळ असतानाही यामध्ये खंड पडलेला नाही. समुद्रातील दोन दीर्घ काळ चाचण्यांचा टप्पा पार पडलेला आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असतांना विक्रांत नौदल सेवेत दाखल होईल, यापेक्षा कुठला सुवर्ण क्षण असू शकतो ? असेही राजनाथ सिंह म्हणाले.