Flood In Delhi : पूराचे पाणी पोहोचले लाल किल्ल्यापर्यंत, एनडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात

दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. आज दुपारी 1 वाजता पाण्याची पातळी 208.62 मीटर नोंदवली गेली. पुराचे पाणी लाल किल्ल्यापर्यंत पोहोचले आहे. नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी दिल्लीतील पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कॅबिनेट मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.

दिल्लीतील पूरस्थिती पाहता नायब राज्यपालांनी डीडीएमएची बैठक बोलावली होती. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दिल्लीतील सर्व शाळा आणि महाविद्यालये रविवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय अत्यावश्यक नसलेल्या कार्यालयांनाही रविवारपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. सर्व खाजगी कार्यालयांना घरून काम करण्यास सांगितले आहे.

अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानात शिरले पाणी –
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानाजवळ यमुना नदीचे पाणी पोहोचले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुराचे पाणी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून सुमारे 250 मीटर अंतरावर आहे. दिल्लीतील सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानात पुराचे पाणी शिरले आहे. दिल्लीतील मेटकाफ रोडवरील सुश्रुत ट्रॉमा सेंटरमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. येथे दाखल असलेल्या 40 रुग्णांना एलएनजेपी रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

दिल्लीत एनडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात –
डीआयजी (एनडीआरएफ) मोहसिन शाहिदी यांनी सांगितले की, आमच्याकडे दिल्लीत एनडीआरएफच्या 12 टीम तैनात आहेत. काल रात्रीपासून बचावकार्य सुरू असून कारवाई सुरू आहे. आम्ही आतापर्यंत विविध भागातील 2500 लोकांना वाचवले आहे. दिल्लीतील यमुनेच्या वाढत्या पाण्याची पातळी पाहता पूरस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) डझनभर तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. गुरुवारी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

एनडीआरएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, मध्य, पूर्व आणि ईशान्य दिल्लीत प्रत्येकी तीन पथके तैनात करण्यात आली आहेत, तर दक्षिण पूर्व दिल्लीत दोन आणि शाहदरा भागात एक पथक तैनात करण्यात आले आहे. पूरग्रस्त भागातील लोकांना बाहेर काढण्यासाठी टीम प्रशासनाला मदत करत आहेत. सर्व टीम बोटी, दोर आणि इतर बचाव उपकरणांनी सुसज्ज आहेत.