नुपूर शर्मा यांना दिल्ली पोलिसांचे संरक्षण; कुटुंबियांसह जीवे मारण्याच्या मिळाल्या होत्या धमक्या

नवी दिल्ली: प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नुपूर शर्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिल्ली पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. तत्पूर्वी, दिल्ली पोलिसांनी भाजपचे माजी प्रवक्ते शर्मा यांना प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याच्या तक्रारींसंदर्भात एफआयआर नोंदवला होता. शर्मा यांनी पोलिसांना मिळणाऱ्या धमक्यांचा हवाला देत सुरक्षा पुरवण्याची विनंती केली होती.

“नुपूर शर्मा यांनी आरोप केला होता की त्यांना धमक्या मिळत आहेत आणि त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांना त्रास दिला जात आहे, त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की,”तपासादरम्यान शर्मा यांनी काही लोकांविरुद्ध शत्रुत्व वाढवल्याबद्दल आणखी एक तक्रार दाखल केली. तक्रारीच्या चौकशीनंतर या प्रकरणात ट्विटरला नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.”

त्याचवेळी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुपूर शर्माविरोधात मुंबईत गुन्हा दाखल असल्याचे सांगितले आहे. पोलीस तपास करून आवश्यक ती कारवाई करतील. अटकेच्या प्रश्नावर ते म्हणाले की, चौकशीनंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल.