पिंपरी | वाढत्‍या तापमानामुळे सुती रुमाला, टोपी आणि गॉगल्सला मागणी

पिंपरी, (प्रतिनिधी) – शहरातील तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्‍याने, उन्हापासून स्वताचा बचाव करण्यासाठी शहरात पांढऱ्या रंगाच्या सुती रुमालाला, मागणी वाढली आहे. केवळ रुमालच नाही तर टोपीची आणि गॉगल्सला देखील मागणी ग्राहकांकडून होत असल्याचे दिसत आहे.

दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने उष्णतेपासून बचाव होण्यासाठी नागरिक टोपी, गॉगल्स, स्कार्प आदी वस्तूंची खरेदी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत सगळीकडे या वस्तूंचे स्टॉल दिसून येत आहेत. उन्हाच्या चटक्यापासून बचाव होण्यासाठी बहुतांश नागरिक रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करून त्यांच्याकडून टोपी, गॉगल्स आदी वस्तूंची खरेदी करताना दिसून येत आहेत.

दुपारी बारानंतर घराबाहेर पडणे नागरिकांना नकोसे वाटते. परंतु नाईलाज असेल आणि कामावर जाणे गरजेचे असल्याने उद्योगनगरीतील काही भागातील रस्ते दुपारी मोकळे दिसत असले तरी, एमआयडीसीतील रस्ते मात्र शिपनुसार नागरिकांनी भरलेले दिसून येत आहेत. परंतु उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक गॉगल्स, डोक्याला ऊन लागू नये यासाठी टोपी तसेच महिला वर्ग स्कार्प वापरताना दिसून येत आहे.

नागरिकांची मागणी लक्षात घेऊन बहुतांश हातगाडी, फिरते विक्रेते यांनी रस्त्याच्या कडेला या वस्तूंची विक्री करणारी दुकाने थाटली आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरीकांनी सुती रुमालाची मागणी वाढवली आहे. त्यामुळे वाढती मागणी लक्षात घेवून विक्रेत्यांनी ही त्या प्रमाणे रुमाल विक्रीसाठी आणले आहेत.

यात प्रामुख्याने सुती रुमालाला जास्त मागणी असल्याने सुती रुमाल पांढऱ्या व इतर रंगातही तसेच वेगवेगळ्या डिझाईनमध्ये देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच लहान मुले किंवा तारूण्यातील मुलांना टोप्यांचे आकर्षण अधिक असते. त्यामुळे विविध रंगाच्या टोप्या ही बाजारात आलेल्या आहेत.

अगदी 30 रुपयापांसून ते 200 रुपयांपर्यंतची टोपी सध्या बाजारात उपलब्ध आहेत. शहरातील चापेकर चौक, पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, चिंचवडगाव बस स्‍थानक व इतर बाजारपेठेतील कपड्याच्या दुकानांवर टोप्या विक्रीस आलेल्या आहेत.