उद्योग मंत्री देसाई यांच्याशी सविस्तर चर्चा; औद्योगिकसह इतर प्रश्‍नी ज्ञानेश्‍वर कटके यांनी वेधले लक्ष

मुंबई : पुणे जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार युवकांसह औद्योगिक वसाहत प्रकल्पांना जमीनी दिलेल्या शेतकरी भूमिपुत्रांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात यावे तसेच घोड धरणातून गाळ काढण्याप्रमाणे अन्य विकासकामांना कंपन्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलीटी (सी.एस.आर.) फंडातून सहकार्य मिळवावे, यासह अन्य मागण्या राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर कटके यांनी लावून धरल्या आहेत. याबाबत मंत्री देसाई यांनी बहुतांशी मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे कटके यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत तसेच त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन उद्योग मंत्री देसाई यांच्या दालनात करण्यात आले होते. यावेळी संपर्क प्रमुख सचिन आहेर, संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, खेड तालुका प्रमुख रामदास धनवटे, शिरूर तालुका प्रमुख सुधीर फराटे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यानुसार शिवसेना जिल्हा प्रमुख कटके यांनी महत्त्वपूर्ण विषया संदर्भात निवेदन दिले. यामध्ये प्रामुख्याने हवेली, शिरूर, खेड तालुक्‍यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरातील नागरिकांच्या अडचणी सोडविणे, भूमीपुत्रांसह शिवसेना कार्यकर्त्यांना कंपन्यांमध्ये रोजगारासाठी प्राधान्य मिळावे, जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगारांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात रोजगार मेळावा घेणे आदी मागण्या करण्यात आल्या.

शिरूर तालुक्‍यातील पंचतारांकीत असलेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीत संदर्भात शेतकऱ्यांच्या तसेच नागरिकांच्या अडचणी सोडविणे, वाढती गुन्हेगारी रोखणे, बसस्थानक उभारणे, शिरूर बसस्थानक आधुनिक विस्तारीकरण, औद्यागिक वसाहतीलगत असलेल्या घोड धरणात साठलेला प्रचंड गाळ उपसावा, औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमुळे घरे बांधणे, दळण-वळण यामध्ये अडचणीत येत अस्याने सदर पाईपलाईन भूमिगत करण्या संदर्भात स्वतंत्र निवेदनही ज्ञानेश्‍वक कटके यांनी मंत्री देसाई यांना दिले आहे.

चाकणच्या विकासासाठी धरला आग्रह !
चाकण औद्योगिक वसाहत परिसरामध्ये सी.एस.आर. फंडाद्वारे विकासकामे करण्यास कंपन्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. याबाबत आपण आदेश, सूचना द्याव्यात, अशी मागणीही जि.प.सदस्य ज्ञानेश्‍वर कटके यांनी खास करून केली. चाकण वसाहतीसाठी खालुंब्रे, निघोज, कुरुळी येथील गायरान जमिनी घेण्यात आल्या आहेत. यामुळे या परिसरात विकास प्रकल्प राबविण्यासाठी ग्रामपंचायतीकडे जागा उपलब्ध नाहीत, त्यामुळे औद्योगिक विकास महामंडळाने विनामोबदलास जागा उपलब्ध करून द्यावी येथे रुग्णालयासारखे उपक्रम कंपन्यांनी स्वफंडातून राबवावेत, अशीही आग्रही मागणी कटके यांनी उद्योगमंत्री देसाई यांच्याकडे केली आहे.