नगर | रात्रीच्यावेळी कोयता घेऊन फिरणारे ताब्यात

नगर, (प्रतिनिधी) – कोयता, लोखंडी गज आणि विना नंबरच्या दुचाकीवरून रात्रीच्यावेळी फिरणार्‍या सहा जणांना तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून कोयता, लोखंडी गज, दोन दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, सतीष भवर, बाळासाहेब भापसे यांचे पथक सोमवारी (दि. १२) रात्री हद्दीत गस्त घालत असताना या पथकाला माहिती मिळाली की, बोल्हेगाव उपनगरातील मोरया पार्क जवळ तीन इसम दुचाकीवर फिरत असून त्यांच्याकडे कोयता आहे.

पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन तिघांना मोपेड दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे चेतन संतोष सरोदे (वय १८ रा. गांधीनगर, बोल्हेगाव), सागर राम कोकणे (वय १९) व यश रावसाहेब क्षिरसागर (वय १८ दोघे रा. भिंगारदिवे मळा) अशी सांगितले. त्यांच्याकडील दुचाकीच्या डिक्कीत धारदार कोयता मिळून आला. तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील दुचाकी, कोयता जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शोध पथक तपोवन रस्त्यावर गस्त घालत असताना बारा एकर परिसरात दुचाकीवर तीन संशयित इसम मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे अविनाश काळु डुकरे (वय १९), सागर बाळू पवार (वय २२) व रोहित विजय फुलारी (वय २३ तिघे रा. गजराजनगर) असे सांगितले. त्यांच्या ताब्यातील विना नंबरच्या दुचाकीचे कागदपत्रे त्यांच्याकडे मिळून आली नाही. तसेच त्यांच्याकडे एक लोखंडी गज मिळून आला. तिघांना ताब्यात घेत दुचाकी, गज जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.