“काश्‍मीरच्या विकासामुळे लोक स्वित्झर्लंड विसरतील’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

जम्मू  – राज्यघटनेचे कलम ३७० हटवण्याची बाब जम्मू-काश्‍मीरच्या सर्वसमावेशक विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. पुढील काही वर्षांत आम्ही जम्मू-काश्‍मीरला आणखी विकसित करू. काश्‍मीरमधील पायाभूत सुविधांमुळे लोक पर्यटनासाठी स्वित्झर्लंडला जाणेही विसरतील, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

जम्मू-काश्‍मीरसाठीच्या ३२ हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पांचा प्रारंभ मोदींच्या हस्ते झाला. त्यानंतर जम्मूत झालेल्या सभेत ते बोलत होते. दहशतवादाशी संबंधित हिंसाचार, फुटीरवादाने जम्मू-काश्‍मीरला अनेक वर्षे ग्रासल्याचा संदर्भ त्यांनी दिला.

याआधी जम्मू-काश्‍मीरमधून केवळ निराशाजनक बातम्या यायच्या. बॉम्ब, बंदुका, अपहरण याबाबी दुर्दैव बनल्या होत्या. मात्र, आज आपण समतोल विकास साधत असणारा नवा जम्मू-काश्‍मीर पाहत आहोत, असे ते म्हणाले.

मागील वर्षी जम्मू-काश्‍मीरच्या श्रीनगरमध्ये जी-२० परिषदेचा इव्हेंट झाला. त्यावेळी काश्‍मीरचे सौंदर्य, परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडल्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले,

अशी पुस्तीही त्यांनी जोडली. केंद्र सरकारने ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवले. त्यानंतर मोदींनी दुसऱ्यांदा जम्मू विभागाचा दौरा केला.