“पाकमध्ये पुन्हा ढाका आपत्ती होऊ शकते”; इम्रान खान यांनी वर्तवली शक्यता

इस्लामाबाद  – इम्रान खान यांनी पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडींची तुलना १९७१ मध्ये तत्कालिन पूर्व पाकिस्तान अर्थात सध्याच्या बांगलादेशमधील स्थितीशी केली आहे. पाकिस्तानमध्ये पुन्हा तशीच स्थिती उद्भवू शकते, असे भाकित त्यांनी वर्तवले आहे. आर्थिक अडचणीत आलेल्या पाकिस्तानाची आर्थिक स्थिती कोसळली जाऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांनी ही भीती व्यक्त केली आहे. देशात स्थिर अर्थकारण जोपर्यंत असत नाही, तोपर्यंत देश आणि संस्था जिवंत राहू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. पीटीआयच्या मध्यवर्ती माध्यम सचिवांनी इम्रान खान यांचा संदेश माध्यमांपर्यंत पोचवला आहे.

जर देशाच्या जनतेला अधिकार दिले जात नाही, तर देशाची आर्थिक प्रगती होईल, असे म्हणता येऊ शकत नाही. १९७० साली देशाचे लष्कर प्रमुख याह्या खान यांना त्रिशंकू संसद हवी होती. मात्र शेख मुजीबूर रेहमान यांच्या पक्षाला संसदेत बहुमत मिळाले, तेंव्हा लष्कराने निवडणुकीत गैरव्यवहार घडवून आणला.

आवामी लीगच्या ८० जागा हिरावून घेतल्या गेल्या. कारण याह्या खान यांना देशाचे अध्यक्ष बनायचे होते, याची आठवण इम्रान खान यांनी करून दिली. त्यासाठी त्यांनी तत्कालिन बांगलादेशमधील हमूदूर रेहमान आयोगाच्या अहवालाची आठवण देखील करून दिली.

तत्कालिन पूर्व पाकिस्तानमध्ये घडलेली स्थिती आता पाकिस्तानमध्ये घडण्याची शक्यता आहे. तेंव्हाही लंडन प्लॅन राबवला गेला होता. आता देखील लंडनमध्ये केलेल्या कटानुसार देशात सरकार लादले गेले आहे, असा आरोप देखील इम्रान यांनी केला.

फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लष्कराच्या मदतीने पीपीपी आणि पीएमएल-एन पक्षांनी जनादेश चोरला असल्याचा आरोप इम्रान खान आणि त्यांच्या पीटीआय पक्षाने वारंवार केला आहे.