मधुमेहाचे डोळ्यावर आणि किडणीवर परिणाम होतात; वर्षातून 2 वेळी चाचणी आवश्यक

पुणे – मधुमेहाचे डोळ्यावर आणि किडणीवर परिणाम दिसून येतात. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्यासाठी वर्षातून दोन वेळा मधुमेहाची तपासणी करणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यातील गुंतागुंत टाळता येऊ शकेल, असा सल्ला मधुमेह तज्ज्ञ डॉ. श्रीपाद भट यांनी दिला. कोथरुड हॉस्पिटलतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विनामूल्य आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिरामध्ये 163 नागरिकांनी लाभ घेतला.

त्यामध्ये हाडांच्या सर्व तपासण्या, व्हिटॅमिन डी, एच.बी., ईसीजी आणि शुगर तपासणी करण्यात आली. नेत्रतज्ञ डॉ. विरेंद्र गोडबोले, डॉ. अश्विन मानोसकर, डॉ. पराग मुनोत, डॉ. तुषार दाते, मधुमेह तज्ञ डॉ. श्रीपाद भट, हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र मिटकर यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. तपासणीमध्ये बऱ्याच रुग्णांना डोळ्यांचे आजार निघाले. त्यांना पुढील सल्ला दिला.