डिजिटल शुभेच्छा आणि 80 किलोंचा केक…

सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी भवनामध्ये 80 किलोचा केक कापून व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून शरद पवार यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पक्ष अभिप्राय मोहिमेमध्ये साडेसहा लाख सभासदांपैकी सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक 80 हजार सभासदांनी भाग घेतल्याने या स्पर्धेत सातारा जिल्ह्याने अव्वल क्रमांक पटकाविल्याबद्दल मुंबईतील कार्यक्रमात जिल्हाध्यक्षांनी बक्षीस स्वीकारले.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सोळसकर, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यावेळी उपस्थित होते.तसेच पक्षाची युवा आघाडी, महिला आघाडी, तसेच विविध सेलचे पदाधिकारी यांची राष्ट्रवादी भवनामध्ये उपस्थिती होती. शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त तब्बल 80 किलोचा केक राष्ट्रवादी भवनामध्ये कापण्यात आला.

यावेळी कार्यकर्त्यानी थेट ऑनलाइन प्रक्षेपण सोहळ्यात पवार यांना शुभेच्छा दिल्या. शरद पवार हे पुरोगामी विचारांचे मोठे विद्यापीठ असून अखंड उर्जेचा स्रोत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची खंबीरपणे दमदार वाटचाल होत राहणार असून त्यांना उदंड आयुष्य लाभो, अशा छोटेखानी मनोगतातून पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. आमदार मकरंद पाटील व बाळासाहेब सोळसकर यांनीही शुभेच्छांसह मनोगत व्यक्त केले. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या ऑडिटोरियममधील मुख्य कार्यक्रम सोहळ्यातून शरद पवार यांनी महाराष्ट्रातील तमाम शुभेच्छांचा स्वीकार केला. अशा शुभेच्छांच्या आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमाच्या जोरावर गेली 55 वर्ष मी अखंडपणे सक्रिय आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

प्रदेशाध्यक्षांनी पक्ष अभियान मोहिमेची घोषणा केली होती. या मोहिमेमध्ये साडेसहा लाख सभासदांपैकी सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक 80 हजार सभासदांनी या मोहिमेत भाग घेतल्याने या स्पर्धेत सातारा जिल्ह्याने अव्वल क्रमांक पटकाविला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी मोहिमेचे पहिले बक्षीस शरद पवार यांच्या हस्ते मुंबईत स्वीकारले. यावेळी आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते. आजपासून दि. 12 ते 17 हे पाच दिवस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने स्वाभिमान दिवस पाळण्यात येणार आहेत. जिल्हयात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राजकुमार पाटील यांनी दिली.

Leave a Comment