राष्ट्रध्वज आयातीला व्यापार संचालनालयाची बंदी

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून निर्णयाचे स्वागत

पुणे – परकीय व्यापार महासंचालकांनी राष्ट्रध्वजाच्या आयातीला बंदी केली आहे. या निर्णयाचे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने म्हणजे केव्हिआयसीने स्वागत केले आहे.

2002 च्या भारतीय राष्ट्रध्वज संहितेमधील भाग एक मधील कलम 1.2 चे निकष पूर्ण न करणाऱ्या राष्ट्रध्वजाच्या आयातीवर बंदी घालण्यात आली असल्याचे महासंचालनालयाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. महासंचालनालयाचा हा निर्णय म्हणजे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाला मिळालेली दिवाळीचे भेट असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

संहितेनुसार ज्या विशिष्ट प्रकारे राष्ट्रध्वज तयार करायचा असतो. अशा प्रकारचा राष्ट्रध्वज परदेशात तयार केला जात नाही. त्यामुळे आता राष्ट्रध्वज फक्त खादी आणि ग्रामोद्योग आयोग तयार करेल असा अर्थ यातून निघतो, असे आयोगाने म्हटले आहे. गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रध्वजाची विक्री कमी होत असल्याचे आयोगाच्या लक्षात आले आहे.

2017 -18 मध्ये राष्ट्रध्वजाची 3.69 कोटी रुपयांची विक्री झाली होती. 2018-19 मध्ये विक्री 14 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 3.16 कोटी रुपये इतकी झाली. यावर्षी आतापर्यंत केवळ 1.94 कोटी रुपयांची विक्री झाली आहे. अयोग्य प्रकारच्या आयातीमुळे विक्री कमी होत असल्याचे आम्ही वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना सांगितले होते. असे आयोगाचे अध्यक्ष विनायकुमार सक्‍सेना यांनी सांगितले. आयात केलेले राष्ट्रध्वज संहितेच्या चौकटीत बसणारे नसतात, याकडेही मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले होते.

Leave a Comment