अहमदनगर -डीजेने तिघांना चिरडले ; दोघांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

संगमनेर – नवरदेवाला वाटे लावण्यासाठी आलेल्या डीजेसमोर मित्रमंडळी, नातेवाइक नाचत असताना डीजे चालकाचे नियंत्रण सुटलेले वाहन थेट समोरच्या जमावात घुसले. यात डोक्यावरून चाक गेल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला.उपचार सुरू असताना वृध्दाची प्राणज्योत मालवली. ही दुर्दैवी  घटना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास तालुक्यातील धांदरफळ खु. येथे घडल्याने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

धांदरफळ खु. येथील किसन रंगनाथ खताळ यांच्या मुलाचे शुक्रवारी (दि. ५ ) तालुक्याच्या पठार भागातील रणखांब येथे लग्न आहे. लग्नासाठी नवरदेवाची परंपरेप्रमाणे गावातून वरातीने वाजत गाजत पाठवणी सुरू होती. त्यासाठी आणलेल्या डीजे (एमएच १६ एई. २०९७ ) समोर मित्रमंडळी, नातेवाईक व भाऊबंद नाचून आनंद व्यक्त करीत होते. दरम्यान, वाहनचालकांमध्ये अदलीबदली झाली.

नव्याने चालक म्हणून बसलेल्या व्यक्तीचा पाय उताराला असलेल्या वाहनाच्या ब्रेक ऐवजी क्लचवर पडल्याने नियंत्रण सुटलेले वाहन थेट समोरच्या जमावात घुसले. क्षणार्धात झालेल्या या घटनेत बाळासाहेब हरीभाऊ खताळ ( वय ३५ ) याच्या डोक्यावरुन चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. वाहनाने चिरडल्याने भास्कर राघु खताळ (वय ६५) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर संगमनेर येथील मेडिकव्हर रुग्णालयात उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत रामनाथ दशरथ काळे, गोरक्ष पाटीलबा खताळ, सोपान रावबा खताळ, भारत भागा खताळ व सागर शंकर खताळ, अभिजीत संतोष ठोबरे (वय २२) व अलका खताळ हे सहाजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच अभिजित ठोंबरे हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.

अपघाताला कारणीभूत ठरलेला माऊली डीजे वलवे यांचा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेने धांदरफळ खुर्दसह लग्न असलेल्या रणखांब गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे घटनास्थळी दाखल झाले. संगमनेरातील जखमी दाखल असलेल्या रुग्णालयांसमोर जमलेल्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

दृश्य पाहून पत्नी रुग्णालयात
दरम्यान डीजेच्या चालकाचा ताबा सुटला आणि डीजे जमावात घुसला. डीजेचे चाक बाळासाहेब खताळ यांच्या डोक्यावरून गेल्याचे त्यांच्या पत्नीने पाहिले. पाहिलेले दृश्य एवढे भयानक होते की त्यावेळी त्या मूर्च्छित पडल्या. त्यांनाही एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जुन्या गाड्यांना तयार करून त्यावर साउंड बॉक्स बसवून डीजे तयार केला जातो. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा परवाना अथवा गाडीचे कागदपत्रे नसतात. तरीदेखील खुलेआम वरातीत, लग्न समारंभ, निवडणुकीच्या मिरवणुकीत डीजेचा वापर केला जातो. आरटीओकडे याबाबत कसलीही नोंद नसते. प्रशासनाने फक्त बघ्याची भूमिका घेतल्याने असे अपघात होत असतात. त्यामुळे सर्वच डीजेवर कारवाई करण्याची मागणी यानिमित्ताने होत आहे.