बंडखोरांना आनंद घेऊ द्या, त्यांना अडचण निर्माण करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवहन

नवी दिल्ली – एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार मुळापासून हाललं आहे. शिंदे गटात सेनेचे ३९ आमदार असून याचाच दाखल देत विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणीची मागणी राज्यपालांकडे मंगळवारी केली होती. राज्यपालांनी देखील यावर तातडीने निर्णय देत गुरुवार (ता.३० जूनला) बहुमत सिद्ध करण्याचे आदेश ठाकरे सरकारला दिले. राज्यपालांच्या या निर्णयाला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होत मात्र तेथे देखील त्यांच्या पदरी निराशाच आली. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि बंडखोरांवर कडाडून टीका केली. शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्या गोव्यावरून मुंबईला येणार असून त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने सीआरपीएफच्या तब्बल दोन हजार जवानांची सुरक्षा दिली आहे. बंडखोर आमदार उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईमध्ये पोहोचणार असून त्यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाल्याने केंद्राने हा निर्णय घेतला आहे.

यावरून उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मध्ये न येण्याचं आदेश दिले आहेत. शिवसेनेला आणि शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला सत्तेवरून खाली खेचलं याचा आनंद बंडखोरांना घेऊ द्या.