देवभूमीला स्मशान करू नका.! केदारनाथमधील ‘त्या’ गंभीर समस्येची करिश्मा तन्ना कडून दखल, केले भावनिक आवाहन…

मुंबई – अभिनेत्री करिश्मा तन्ना टेलिव्हिजनवरील एक स्टायलिश अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर करिश्मा चांगलीच सक्रिय असते. ती सोशलवर नेहमीच आपले स्वतःचे वेगळ्या अंदाजात फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतंच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून, हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी देखील तिच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देण्यास सुरवात केली आहे.

अभिनेत्री करिश्मा तन्नाने शेअर केलेला हा उत्तराखंड येथील ‘केदारनाथ’चा आहे. यात तिने “आमच्या पवित्र देवभूमीला हजारो मृत घोड्यांचे स्मशान होण्यापासून वाचवा..!’ असे म्हटले आहे. अनेकांचे श्रद्धास्थान असलेले ठिकाण म्हणजे केदारनाथ. सुमारे 3 हजार 538 मीटर उंचीवर असलेल्या या मंदिरात जगभरातून लाखो भाविक येतात.

यात गौरी कुंड ते केदारनाथ धाम मंदिरापर्यंतचा प्रवास करण्यासाठी 8 ते 9 तास लागतात. लांबचा पल्ला असल्यामुळे अनेक जण घोडे किंवा डोलीच्या माध्यमातून मंदिरापर्यंत पोहोचतात. मात्र, या प्रवासात अनेकवेळा घोड्यांना मृत्युमुखी पडावे लागत असून त्यांना गंभीर इजा देखील होताना दिसत आहे.

त्यामुळेच करिश्मा म्हणाली, “जेव्हा हे प्राणी तुम्हाला स्वत:च्या पाठीवर बसवून तीर्थयात्रेला घेऊन जातात. त्यावेळी त्यांना प्रचंड शारीरिक त्रास होत असतो. पण, तरीही तुम्हाला त्यांचा त्रास दिसत नाही का?

तुम्ही देवाचे दर्शन घेत असताना तुमच्यामुळे एका जीवाचे प्राण जात आहे हे तुम्हाला दिसत नाही का? तीर्थयात्रेला जाऊन तुम्ही पाप करून येताय. किमान आता तरी जागे व्हा आणि स्वत:च्या पायाने चालत जाऊन देवदर्शन करा..’ असं अभिनेत्री आपल्या व्हिडिओमध्ये म्हणाली आहे.

केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचकेदार ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते.

केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर आहे. त्यामुळे गौरीकुंडहून 14 किलोमीटर लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते. मंदिरापर्यंत जाण्यासाठी घोडा, डोली आणि हेलिकॉप्टर इत्यादी… पर्याय उपलब्ध आहेत.